Ashneer Grover Fund My Staff launch news and company guaranteed employee loans: ‘भारत पे’चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी नुकतेच फंड माय स्टाफ नावाचा एक फिनटेक प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे कर्मचाऱ्यांना कर्ज घ्यायचे असेल तर त्यांची कंपनी जामीनदार होऊ शकते.

लिंक्डइनवर हा प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा करताना, ग्रोव्हर यांनी लिहिले, “श्रीमंत विरुद्ध गरीब यावर खूप चर्चा झाली, आता प्रत्यक्ष कृतीबद्दल बोलूया. प्रत्येक कंपनीतील कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हाला त्यांना मदत करायची असते, पण पैशांचा प्रश्न आला की गोष्टी अडखळतात. तुम्ही फक्त हमी द्या, आम्ही कर्ज देऊ.”

‘फंड माय स्टाफ’द्वारे कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, कर्जाची मर्यादा निश्चित करणे, कर्मचाऱ्यांच्या कर्जाच्या विनंत्यांवर कार्यवाही करणे आणि कामाच्या ठिकाणी हमी देऊन त्या मंजूर करणे शक्य होते. एकदा कंपनीने विनंती मंजूर केली की, कर्मचाऱ्याला कर्ज वितरित केले जाईल आणि त्याची परतफेड मासिक हप्त्यांद्वारे (EMIs) केली जाईल.

ज्या कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करायची आहे त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. ज्या कर्मचाऱ्यांची क्रेडिट हिस्ट्री मर्यादित आहे किंवा अजिबातच नाही आणि त्यामुळे ज्यांना वैयक्तिक कर्ज मिळवण्यात अडचणी येतात त्यांना याचा फायदा होऊ शकतो. प्लॅटफॉर्मच्या संकेतस्थळावर नमूद केल्यानुसार, यात कंपन्यांना कर्जाची परतफेड करावी लागणार नाही, त्या केवळ कर्मचाऱ्याच्या कर्जात्या जामिनदार असतील. तर कर्ज घेतलेले कर्मचारी स्वतः विहित कालावधीत या कर्जाची परतफेड करतील.

फंड माय स्टाफ

‘फंड माय स्टाफ’ हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ऑनलाइन कर्ज देण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्ज सेवा प्रदाता (LSP) म्हणून चालते, असे वेबसाइटवर नमूद केले आहे. सध्या या साइटवर आरबीआय-नोंदणीकृत एनबीएफसी असलेल्या ‘ॲश ग्रोव्ह कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड’चे नाव कर्ज भागीदार म्हणून सूचीबद्ध आहे.

ही सेवा दिल्लीस्थित ‘थर्ड युनिकॉर्न’ या कंपनीने विकसित केली आहे. ‘भारत पे’मधून बाहेर पडल्यानंतर ग्रोव्हर आणि असीम घावरी यांनी या कंपनीची स्थापना केली होती. ‘थर्ड युनिकॉर्न’ने यापूर्वी २०२४ मध्ये ‘झिरो-पे’ हे वैद्यकीय वित्तपुरवठा करणारे ॲप लाँच केले होते, तसेच ‘क्रिक-पे’ हे फॅन्टसी क्रिकेट प्लॅटफॉर्मही चालवले होते, ज्याचे कामकाज फेब्रुवारी २०२५ मध्ये बंद झाले.