Ashneer Grover UPI Charges News : २००० रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर आणि रुपे (RuPay) डेबिट कार्डच्या वापरावर कोणतेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क आकारता येणार नाही, अशी अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. मात्र, यामुळे २००० रुपयांवरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. आता भारतपेचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोवर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, “UPI वर कोणत्याही प्रकारचे शुल्क लादणे हा मूर्खपणाचा निर्णय आहे”.
“५ मिनिटांत दूध का दूध, पाणी का पाणी”
अश्नीर ग्रोवर यांनी एका खासगी न्यूज चॅनेलला दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ पोस्ट करत सरकारवर सडकून टीका केली आहे. ग्रोवर म्हणतात, देशातही कोणत्याही नागरिकाने ५ मिनिट गुगलवर शोधलं तर सत्य समोर येईल. यासाठी त्यांनी आकडेवारीचा संदर्भ दिला आहे.
- भारतीय रिझर्व्ह बँकेचा सरकारला मिळालेला सरप्लस निधी: तब्बल २.८७ लाख कोटी रुपये (अंदाजे ३० अब्ज डॉलर).
- देशातील सर्व सूचीबद्ध बँकांचा एकूण नफा: ४.११ लाख कोटी रुपये (अंदाजे ४२ अब्ज डॉलर).
- UPI चालवणाऱ्या NPCI चा करपूर्व ‘सरप्लस’ : १,८८८ कोटी रुपये (अंदाजे २० कोटी डॉलर).
दुसरीकडे, भारतात एटीएम चालवणे आणि रोख चलनाची हाताळणी यांचा वार्षिक खर्च तब्बल ३०,५०० कोटींहून अधिक आहे. जाणकारांच्या मते, हा खर्च कमी करायचा असेल तर एटीएम बंद करून UPI ला प्रोत्साहन देणे हाच एकमेव परवडणारा मार्ग आहे. अशा वेळी UPI मुळे नेमके कोणाचे नुकसान होत आहे आणि सरकार कोणती मोठी ‘सबसिडी’ देत आहे? ज्यामुळे अडचण होत आहे, असा सवाल ग्रोवर यांनी उपस्थित केला आहे.

अश्नीर ग्रोवर यांचा आक्रमक पवित्रा
या संपूर्ण घडामोडींवर अश्नीर ग्रोवर यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “UPI वर कोणतेही शुल्क लादणे म्हणजे सरळ सरळ कर वसुली आहे. यूपीआय हे भारताचे एक असे वैज्ञानिक आणि यशस्वी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्याचे जगभरात कौतुक होते; पण आता दुर्दैवाने ते कराचा बळी ठरेल,” असा इशारा ग्रोवर यांनी दिला आहे.
पुढील दिशा काय?
जरी सरकारने २००० रुपयांपर्यंतचे व्यवहार सध्यातरी शुल्क-मुक्त ठेवले असले, तरी भविष्यात यावरील मूल्यांच्या व्यावसायिक व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) आणला जाण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू आहे. सरकारचे म्हणणे आहे की यामुळे बँकांना आणि फिनटेक कंपन्यांना सुरक्षेमध्ये आणि तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यास बळ मिळेल. परंतु, तज्ज्ञांच्या मते, या शुल्काचा बोजा अखेर ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाऊ शकतो.
