Home Loan original property documents lost by Axis Bank: गृहकर्ज घेतेवेळी दिल्लीतील एका जोडप्याने ॲक्सिस बँकेमध्ये फ्लॅटच्या मूळ मालकी हक्काची कागदपत्रे तारण म्हणून ठेवली होती. ही कागदपत्रे बँकेकडून गहाळ झाल्यामुळे दिल्ली राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या आयोगाच्या अध्यक्षा संगीता धिंग्रा सहगल आणि सदस्य बिमला कुमारी यांनी नुकतेच ॲक्सिस बँकेला सेवेतील त्रुटीसाठी जबाबदार धरले आहे. याचबरोबर बँकेने या पीडित जोडप्याला नुकसान भरपाई म्हणून १५.५० लाख रुपये द्यावे असे आदेश दिले.

घराच्या मूळ मालकी हक्काची कागदपत्रे शोधून द्यावीत किंवा ते गहाळ केल्याबद्दल नुकसानभराई देण्याचे निर्देश बँकेला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका या जोडप्याने ग्राहक आयोगाकडे केली होती.

“मालकी हक्काची मूळ कागदपत्रे हरवल्यामुळे तक्रारदारांच्या मालकी हक्कावर बाधा आली आहे, हे स्पष्ट आहे. तसेच निष्काळजीपणाच्या कारणास्तव नुकसानभरपाईची मागणी करणे हा एक कायदेशीर अधिकार आहे. तसेच, मालमत्ता तक्रारदारांच्या ताब्यात असल्याने त्यांना कोणताही आर्थिक फटका बसलेला नाही, असा ॲक्सिस बँकेचा युक्तिवाद टिकणारा नाही. कारण मूळ कागदपत्रे हरवल्यामुळे मालकी हक्कावर सतत संशयाचे सावट निर्माण होते”, असे २२ जून रोजीच्या ग्राहक आयोगाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आयोगाने नमूद केले की, ॲक्सिस बँकेने मालकी हक्काची मूळ कागदपत्रे हरवल्याची केलेली पोलीस तक्रार, दिलेली जाहीर सूचना, विक्रीची प्रमाणित पत्र (सेल डीड) आणि वकिलाचे सादर केलेले प्रमाणपत्र यावरून हे स्पष्ट होते की, मूळ मालकी हक्काची कागदपत्रे बँकेच्या ताब्यात असतानाच्या काळातच ‘गहाळ’ झाली होती.

काय आहे प्रकरण?

संबंधित जोडप्याने दावा केला होता की, ते दिल्लीतील एका मालमत्तेचे मालक आणि रहिवासी आहेत. तसेच, ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्यांनी मार्च २०१८ मध्ये ॲक्सिस बँकेकडून १.४१ कोटी रुपयांचे गृहकर्ज घेतले होते आणि त्यापोटी मालमत्तेची मालकी हक्काची कागदपत्रे बँकेकडे गहाण ठेवली होती. मालकी हक्काची मूळ कागदपत्रांसह सर्व मूळ कागदपत्रे ॲक्सिस बँकेकडे जमा करण्यात आली होती आणि बँकेने ५ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या पावतीद्वारे त्याची पोच दिली होती.

या जोडप्याने कथितरीत्या कर्जाची संपूर्ण रक्कम परत केली आणि मार्च २०२१ मध्ये त्यांचे कर्जाचे खाते बंद करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बँकेकडे मालमत्तेची मूळ मालकी कागदपत्रे परत करण्याची विनंती केली. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही ॲक्सिस बँकेने मलकी हक्काची मूळ कागदपत्रे परत केली नाहीत. नंतर बँकेने त्यांना कळवले की संबंधित कागदपत्रे गहाळ झाली आहेत. यानंतर या जोडप्याने ग्राहक आयोगात धाव घेतली होती.