Ayodhya Ram Mandir Trust Audit Marathi : अयोध्या राममंदिर निर्माणासाठी गोळा करण्यात आलेल्या निधी आणि देणग्यांवरून विरोधकांनी केलेले आरोप आणि निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आक्रमक पाऊल उचलले आहे. ट्रस्टने आपले सर्व हिशोब, देणग्यांची वहीखाती आणि जमा-खर्चाचा तपशील थेट जनतेसमोर खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. पारदर्शकता सिद्ध करण्यासाठी ट्रस्टने आता जनतेलाच या हिशोबांची जाहीर छाननी करण्याचे थेट आव्हान दिले आहे.

वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न

गेल्या काही काळापासून राममंदिर निधी संकलनात आणि जमीन खरेदी व्यवहारात कथित गैरव्यवहार झाल्याचे आरोप राजकीय वर्तुळातून सातत्याने केले जात होते. या आरोपांमुळे ट्रस्टच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत होता. आता थेट खातीच सार्वजनिक करून सर्व आरोपांमधील हवा काढून घेण्याची रणनीती ट्रस्टने आखली आहे.

नेमके काय आहे ट्रस्टच्या रणनीतीत?

डिजिटल पारदर्शकता: ट्रस्टकडे आलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब, देणगीदारांची नावे (गोपनीयता नियम पाळून) आणि झालेला खर्च यांचा संपूर्ण लेखाजोखा डिजिटल स्वरूपात किंवा अधिकृत माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे. कोणताही नागरिक किंवा संस्था या हिशोबांची तपासणी करू शकणार आहे. यामध्ये ऑडिट रिपोर्टचाही समावेश असेल. आम्हाला काहीही लपवायचे नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत ट्रस्टने या निर्णयाद्वारे विरोधकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.

राममंदिर हा केवळ धार्मिक विषय नसून देशातील सर्वात मोठा संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी मुद्दा आहे. सध्या निधी चोरीच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापले होते. आता ऑडिट रिपोर्ट्स आणि हिशोबांची पुस्तके जनतेसाठी खुली करून ट्रस्टने बचावात्मक पवित्र्याऐवजी थेट ‘फ्रंट फूट’वर येत आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा निर्णय केवळ पारदर्शकता सिद्ध करण्यासाठी नाही, तर कोट्यवधी भाविकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी ट्रस्टने टाकलेले एक मोठे आणि आवश्यक पाऊल मानले जात आहे.

निधी समर्पण अभियान आणि कॉर्पोरेट देणग्या

देशभरात चालवलेले ‘निधी समर्पण अभियान’ आणि बड्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून ट्रस्टला एकूण ३,२४६ कोटी मिळाले. या प्रचंड निधीमधुन राममंदिर बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आतापर्यंत तब्बल २,७५० कोटी खर्च करण्यात आले आहेत.

भाविकांचे अर्पण आणि इतर देणग्या (३१ मार्च २०२५ पर्यंत)

राममंदिर आंदोलनाच्या सुरुवातीपासून ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत भाविकांनी थेट चरणी अर्पण केलेले आणि इतर माध्यमांतून एकूण ५८२ कोटी जमा झाले. या निधीमधून दैनंदिन व्यवस्थापन आणि इतर प्रशासकीय कामांसाठी ३११ कोटी खर्च झाले आहेत. या खात्यातील उर्वरित सर्व रक्कम सुरक्षितपणे ट्रस्टच्या बँक खात्यांमध्ये जमा आहे.