पीटीआय, नवी दिल्ली : न्यूयॉर्कस्थित जागतिक गुंतवणूकदार कंपनी जनरल अटलांटिकने बालाजी वेफर्समधील हिस्सा खरेदी करण्याची योजना आखली आहे. शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त निवेदनानुसार, बालाजी वेफर्सने धोरणात्मक गुंतवणुकीसाठी जनरल अटलांटिकसोबत करार केला असून, या गुंतवणुकीतून या गुजरातस्थित कंपनीच्या विस्ताराला गती मिळणे अपेक्षित आहे.

उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल अटलांटिककडून बालाजी वेफर्समध्ये २,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केली जाण्याची आणि ७ टक्के हिस्सा खरेदी केला जाण्याची शक्यता आहे. परिणामी या कंपनीचे मूल्यांकन सुमारे ३५,००० कोटी रुपयांच्या घरात पोहचेल.

बालाजी वेफर्स कंपनीला आर्थिक गुंतवणुकीसह संपूर्ण देशभरात पदचिन्हे विस्तारताना, जनरल अटलांटिकच्या अन्न आणि ग्राहक क्षेत्रातील जागतिक अनुभवाचा फायदा देखील मिळणार आहे. शिवाय जागतिक दर्जाच्या सुविधा स्थापन करण्यासाठी आणि नावीन्यपूर्णतेसाठी ही गुंतवणूक उपयोगात आणली जाईल.

ग्राहकांनी बालाजी वेफर्सच्या गुणवत्तेवर आणि चवीवर विश्वास ठेवला असून, ती गुणवत्ता कायम ठेवत संपूर्ण देशात विस्तार करण्यास उत्सुक आहोत, असे बालाजी वेफर्सचे संस्थापक आणि अध्यक्ष चंदूभाई विराणी म्हणाले.

शून्यातून सुरुवात

१९७४ च्या सुमारास भिखुभाई आणि कनुभाई या भावांच्या मदतीने राजकोटमधील ॲस्ट्रॉन या सिनेमागृहाच्या कॅन्टीनमध्ये या कंपनीने काम सुरू केले होते. सुरुवातीला त्यांनी स्वतः घरी वेफर्स बनवून सिनेमागृहात विकण्यास सुरुवात केली. एका छोट्या शेडमधून सुरू झालेला हा व्यवसाय आज ५,००० कोटी रुपयांहून अधिक उलाढालीचा झाला आहे.

आता, बालाजी वेफर्स त्यांचे उत्पादन जगभरातील सुमारे २५ देशांमध्ये निर्यात करते. एका अहवालानुसार, भारतीय स्नॅक्स बाजारपेठेचे आकारमान २०२४ मध्ये ४६,५७१.३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. वर्ष २०२५-२०३३ या काळात ८.६३ टक्के वाढीच्या दराने हा बाजार २०३३ पर्यंत १,०१,८११.२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

भारतीय कंपन्यांचे जगाला आकर्षण

जनरल अटलांटिक आणि बालाजी वेफर्सदरम्यान होणारा करार हा जागतिक कंपन्यांचा देशातील स्थानिक उद्योगांवरील वाढता रस दर्शवतो. गेल्या वर्षी मार्चमध्ये, देशातील आघाडीची खाद्यपदार्थ कंपनी हल्दीरामने तीन धोरणात्मक गुंतवणूकदारांसोबत भागीदारीची घोषणा केली होती. यामध्ये सिंगापूरमध्ये मुख्यालय असलेली जागतिक गुंतवणूक कंपनी टेमासेक, अल्फा वेव्ह ग्लोबल आणि इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी (आयएचसी) यांचा समावेश होता. या कराराचा तपशील उघड झाला नसला तरी, उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की हा करार सुमारे १० अब्ज डॉलर म्हणजेच ८५,००० कोटी रुपयांना पार पडला असण्याची शक्यता आहे.