Bank 5 Day Week Saturday Holiday Fact Check : आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संपाची हाक दिली होती. यामध्ये ५ दिवसांचा कामाचा आठवडा ही मुख्य मागणी होती. चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला. दरम्यान, आता सोशल मीडियावर एक राजपत्र प्रत जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल पत्रानुसार, केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियासह सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी प्रत्येक शनिवार सार्वजनिक सुटी म्हणून जाहीर केल्याचा दावा केला होता. मात्र, केंद्र सरकारने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून हे राजपत्र खोटे असल्याचे म्हटले आहे.
पीआयबी फॅक्ट चेकचा खुलासा
सोशल मीडियावर फिरत असलेले हे पत्र केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या नावाने जारी केल्याचं छापलं आहे. मात्र, केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे पत्र खोटं असल्याचे स्पष्ट केलं आहे. वित्त मंत्रालयाने बँकांसाठी प्रत्येक शनिवार सुटी घोषित करणारी कोणतीही अधिसूचना जारी केली नसल्याचे पोस्टमध्ये लिहिलेलं आहे.
सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
पीआयबीच्या या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक युजर्सनी बँक कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांच्या आठवड्याची मागणी न्याय असल्याचे म्हटलं आहे.
एका युजरने लिहिलंय, की ” बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असून ते रोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत काम करतात. मनुष्यबळाचा अभाव आणि विविध टार्गेट्समुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांना आठवड्यातून दोन दिवस विश्रांती मिळणे ही त्यांची मूलभूत गरज आहे.” तर दुसऱ्या एका युजरने मिश्कीलपणे लिहिले, “फेक आहे, पण त्याला रिअल बनवा!”
बँक संप तूर्तास टळला, पण इशारा कायम
बँक कर्मचारी संघटना आणि सरकारमधील संघर्ष तीव्र झाला असतानाच हे पत्र व्हायरल झालं आहे. बँक कर्मचारी संघटनांच्या मते, गेल्या वर्षी (८ मार्च २०२४) झालेल्या संयुक्त करारात यावर सहमती झाली होती. मात्र, आता सरकार आम्ही असा शब्द दिला नसल्याचे बोलत आहे. सध्या ३ दिवसांचा संप पुढे ढकलण्यात आला असला, तरी २६ ऑक्टोबरपासून बेमुदत देशव्यापी संप पुकारण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
