Bank of Baroda Q2 Results : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही निव्वळ नफा नोंदवला आहे. जुलै ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत बँकेचा नफा ३५.८ टक्क्यांनी वाढून ६,५३२ कोटी रुपयांवर पोहोचला. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेने ४,८०९.३९ कोटी रुपयांचा नफा कमावला होता.

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) समभाग विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नामुळे बँकेच्या बिगर व्याज उत्पन्नात मोठी वाढ झाली. त्यामुळे विक्रमी नफ्याला हातभार लागला. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) नऊ टक्क्यांनी वाढून १३,०२६ कोटी रुपये झाले. मागील वर्षी याच तिमाहीत ते ११,९५४ कोटी रुपये होते. बिगर व्याज उत्पन्नात मात्र जवळपास ९६ टक्क्यांची मोठी वाढ झाली. हे उत्पन्न ६,८८१ कोटी रुपयांवर पोहोचले. त्यामध्ये बँकेच्या गुंतवणूक विभागातून मिळालेल्या उत्पन्नाचा मोठा वाटा होता. तिमाहीत बँकेचे ट्रेझरी उत्पन्न ४,०९३ कोटी रुपये झाले. मागील वर्षी याच तिमाहीत ते १,०८६ कोटी रुपये होते.

बँकेचा निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) मागील तिमाहीच्या तुलनेत तीन आधारबिंदूंनी कमी होऊन २.७४ टक्क्यांवर आला. तर कर्जखात्यांशी संबंधित तरतुदींमध्ये वार्षिक तुलनेत ९३ टक्क्यांची वाढ होऊन त्या २,३८२ कोटी रुपयांवर पोहोचल्या. मात्र, मागील तिमाहीतील ६,३२३ कोटी रुपयांच्या तुलनेत या तरतुदी कमी आहेत.

कर्जवाढ आणि ठेवींमध्येही वाढ

सप्टेंबरअखेर बँकेची देशांतर्गत कर्जे १३.५ टक्क्यांनी वाढून ११.८७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. जागतिक कर्जवाटपात १८.३ टक्क्यांची वाढ होऊन ते १५.१२ लाख कोटी रुपये झाले. देशांतर्गत ठेवींमध्ये १६.६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून त्या १४.८३ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या. जागतिक ठेवी १६.४ टक्क्यांनी वाढून १७.४५ लाख कोटी रुपये झाल्या.

बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेतही सुधारणा झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत एकूण अनुत्पादित कर्जांचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण मागील वर्षीच्या २.१६ टक्क्यांवरून कमी होऊन १.७८ टक्क्यांवर आले. निव्वळ अनुत्पादित कर्जांचे (नेट एनपीए) प्रमाण ०.५७ टक्क्यांवरून ०.३७ टक्क्यांवर घसरले.