हैदराबाद : डिजिटल व्यवहारांचा विस्तार होत असताना आर्थिक फसवणूक आणि सायबर जोखमींचे आव्हानही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि मशीन लर्निंगच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रातील सायबर फसवणूक रोखण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करण्यावर भर देण्यात आला. बँक ऑफ इंडियाने आयआयटी हैदराबादच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘सायबरशिल्ड हॅकेथॉन २०२६’ची सांगता शुक्रवारी झाली.
सार्वजनिक क्षेत्रातील बँका, शैक्षणिक संस्था आणि युवा नवोन्मेषक यांच्यातील सहकार्य वाढवून बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील प्रत्यक्ष आव्हानांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधणे, हा या हॅकेथॉनचा मुख्य उद्देश होता. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभाग आणि इंडियन बँक्स असोसिएशनच्या संयुक्त उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
२,९३६ स्पर्धकांचा सहभाग
हॅकेथॉनला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. एकूण २,९३६ स्पर्धकांनी नोंदणी केली. छाननीनंतर प्रोटोटाइप सादरीकरणासाठी ७२ स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यात ६८ संघ आणि चार वैयक्तिक स्पर्धकांचा समावेश होता. सायबरसुरक्षेच्या दोन महत्त्वाच्या आर्थिक आव्हानांवर उपाय शोधण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर ठेवण्यात आले होते. पहिल्या समस्येत फसवणूक करणारे मोबाइल अॅप्लिकेशन (APK) आणि मालवेअर ओळखणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि जोखीम गुणांकन करणे यासाठी जनरेटिव्ह एआयचा वापर अपेक्षित होता.
दुसऱ्या समस्येत संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि ‘म्यूल’ खाती ओळखण्यासाठी एआय/एमएल प्रणाली विकसित करणे अपेक्षित होते. सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम म्यूल खात्यांच्या माध्यमातून पुढे वळवली जाते. त्यामुळे अशा खात्यांची वेळेत ओळख झाल्यास आर्थिक फसवणुकीची साखळी रोखण्यास मदत होऊ शकते.
डिजिटल अर्थव्यवस्थेतील सायबर जोखीम
डिजिटल बँकिंग, मोबाइल पेमेंट आणि ऑनलाइन व्यवहारांचा वाढता वापर पाहता सायबरसुरक्षा आता केवळ तांत्रिक विषय न राहता वित्तीय स्थैर्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. फसवणूक करणारे मोबाइल अॅप, मालवेअर, बनावट व्यवहार आणि म्यूल खाती यामुळे ग्राहकांबरोबरच बँकांनाही आर्थिक आणि प्रतिष्ठेच्या जोखमीला सामोरे जावे लागते.
या पार्श्वभूमीवर व्यवहाराच्या वेळीच संशयास्पद हालचाली ओळखणाऱ्या एआय-आधारित प्रणाली विकसित झाल्यास फसवणूक रोखण्याचा वेग वाढू शकतो. तसेच बँकांच्या जोखीम व्यवस्थापनाचा खर्च आणि मानवी हस्तक्षेपावरील अवलंबित्व कमी करण्यासही अशा तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते.
बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश कर्नाटक यांनी डिजिटल फसवणुकीची गुंतागुंत वाढत असल्याने बँकांनी तांत्रिक क्षमता सातत्याने मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. हॅकेथॉनमधील मोठा सहभाग भारतातील विद्यार्थी आणि नवोन्मेषकांमध्ये सुरक्षित डिजिटल बँकिंग परिसंस्था उभारण्याबाबतची उत्सुकता दर्शवतो, असे त्यांनी नमूद केले.
आयडीआरबीटीचे संचालक डॉ. दीपक कुमार यांनीही डिजिटल वित्तीय परिसंस्थेच्या विस्ताराबरोबर सायबरसुरक्षा आणि फसवणूक प्रतिबंधक क्षमता मजबूत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, शैक्षणिक संस्था आणि युवा नवोन्मेषक यांच्यातील सहकार्यामुळे नव्या सायबर जोखमींवर व्यावहारिक आणि विस्तारक्षम उपाय विकसित करण्यास गती मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.
आयआयटी हैदराबादचे संचालक प्रा. बी. एस. मूर्ती यांनी हॅकेथॉनमुळे शैक्षणिक नवोन्मेष आणि बँकिंग उद्योगाच्या प्रत्यक्ष गरजा यांच्यातील दुवा मजबूत होत असल्याचे सांगितले.
सायबरसुरक्षेत नव्या तंत्रज्ञानाला चालना
सायबरशिल्ड हॅकेथॉनमधून विकसित होणारे तंत्रज्ञान व्यावसायिक पातळीवर वापरता आल्यास बँकिंग क्षेत्रातील फसवणूक शोधणे, जोखीम मोजणे आणि संशयास्पद व्यवहारांवर तातडीने कारवाई करणे अधिक प्रभावी होऊ शकते. त्यामुळे वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेत ग्राहकांचा विश्वास टिकवण्याबरोबरच वित्तीय संस्थांच्या सायबरसुरक्षा व्यवस्थेलाही बळ मिळण्याची अपेक्षा आहे. समारोप कार्यक्रमाला बँक ऑफ इंडिया, आयआयटी हैदराबाद, आयडीआरबीटी, सी-डॅक आणि इतर संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
