पुणे : देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) मर्यादित कालावधीसाठी पावसाळी धमाका ऑफर जाहीर केली आहे. बॅंकेतर्फे देण्यात येणाऱ्या गृह कर्जावरील व्याजदर घटवून ७ टक्के केला आहे. तसेच या कर्जावरील प्रक्रिया व दस्तऐवजीकरण शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. हा वार्षिक व्याज दर हा बँकिंग उद्योगातील सर्वांत कमी व्याजदरांपैकी असल्यामुळे ग्राहकांच्या कर्जाचा मासिक हप्त्याचा भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, असे महाबँकेने म्हटले आहे.
महाबँकेने जाहीर केलेल्या या तिहेरी धमाक्यामुळे सर्व ग्राहकांना चांगली वित्तीय सेवा देऊन त्याद्वारे त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी असलेली बँकेची कटिबद्धता अधोरेखित होते. गृह कर्जावरील ७ टक्के व चारचाकी वाहनावरील ७.४५ टक्के वार्षिक व्याजदर हा बँकिंग उद्योगातील सर्वात कमी व्याजदरांपैकी असून शून्य प्रक्रिया व दस्तऐवजीकरण शुल्कामुळे ग्राहकांवरील मासिक हप्त्याचा भारही लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल.
ग्राहक किरकोळ कर्जासाठी प्रस्ताव अर्ज नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. https://digileads.bankofmaharashtra.bank.in/retail-loan या लिंकवर क्लिक करून ग्राहक थेट अर्ज सादर करू शकतात. महाबॅंकेतर्फे गृह कर्जाचे सुधारित व्याजदर, शून्य प्रक्रिया व दस्तऐवजीकरण शुल्काबाबत तसेच अन्य वित्तीय सेवांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांनी बँकेच्या https://bankofmaharashtra.bank.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महाबॅंकेने केले आहे.
महाबँकेला २ हजार २० कोटी रुपयांचा नफा
महाबँकेला चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत २ हजार २० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकेच्या नफ्यात २७ टक्के वाढ नोंदविण्यात आली असून, बुडीत कर्जे आणि व्याज उत्पन्नाच्या पातळ्यांवरही बँकेने चांगली कामगिरी केली आहे. महाबँकेने एप्रिल ते जून तिमाहीचे आर्थिक निकाल तुकतेच जाहीर केले. याप्रसंगी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी निधून सक्सेना म्हणाले की, बँकेने पहिल्या तिमाहीत ९ हजार ६३ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळवले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ७ हजार ८७९ कोटी रुपये होते. पहिल्या तिमाहीत बँकेचा मालमत्तेवरील परतावा वाढून १.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. बँकेने ८ हजार ३७ कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न मिळविले आहे. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढून ३ हजार ७७० कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ३ हजार २९२ कोटी रुपये होते.
