मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील ‘महाबँके’ने (बँक ऑफ महाराष्ट्र) एप्रिल ते जून २०२६ या पहिल्या तिमाहीत कर्ज वितरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ टक्के वाढ नोंदविली आहे. यामुळे महाबँकेचे एकूण कर्ज वितरण ३.०६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बँकेने एकूण व्यवसायात ६.५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

पुण्यात मुख्यालय असलेल्या महाबँकेने भांडवली बाजाराला सोमवारी ही माहिती दिली. यानुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून तिमाहीअखेर बँकेचे एकूण वितरीत कर्ज रक्कम २.४१ लाख कोटी रुपये आहे. बँकेच्या किरकोळ, कृषी आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील कर्ज वितरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के वाढ होऊन ते १.८७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याचवेळी बँकेचे उद्योगधंद्यांना कर्ज १ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून १.११ लाख कोटी रुपये झाले आहे. त्यात वर्षागणिक २१ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

बँकेने पहिल्या तिमाहीमध्ये एकूण ठेवींमध्ये १३ टक्के वाढ नोंदविली असून, त्या ३.४४ लाख कोटी रुपये झाल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या अखेरीस एकूण ठेवी ३.०५ लाख कोटी रुपये होत्या. पहिल्या तिमाहीअखेरीस बँकेचा एकूण व्यवसाय (कर्ज व ठेवी मिळून) १९ टक्के वाढीसह ६.५१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीअखेरीस तो ५.४६ लाख कोटी रुपये होता. बँकेचे ‘कासा गुणोत्तर’ पहिल्या तिमाहीत एकूण ठेवींच्या ४९ टक्के आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ५० टक्के होते, असे बँकेने म्हटले आहे.