Bank of Maharashtra : तुमचे जर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’नं ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि खात्यांचा गैरवापर रोखण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ज्या बचत किंवा चालू खात्यांमध्ये ३ वर्षांहून अधिक काळ कोणतेही आर्थिक व्यवहार झालेले नाहीत आणि खात्यातील शिल्लक रक्कम शून्य आहे, अशी खाती बंद करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. जर तुमचं किंवा कुटुंबातील सदस्यांचं खातं खूप काळापासून वापरात नसेल तर त्वरीत बँकेत संपर्क करा.

ग्राहकांसाठी महत्त्वाची मुदत आणि आवाहन

बँकेच्या सूचनेनुसार, ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ज्या बचत किंवा चालू खात्यांमध्ये सलग तीन वर्षे वा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही आणि शिल्लक शून्य आहे, अशा खातेधारकांना त्यांची केवायसी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या तारखेनंतर खाते निष्क्रीय होणार?

जे ग्राहक ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून खाती पुन्हा कार्यान्वित करणार नाहीत, अशा खात्यांवर ३० नोव्हेंबर २०२६ रोजी किंवा त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता नियमांनुसार कारवाई केली जाईल. बँकिंग सेवांचा अखंडित लाभ घेण्यासाठी आणि आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधित खातेधारकांनी तातडीने आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधून केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

निष्क्रीय खात्यातील पैसे कुठे जातात?

१० वर्षांपेक्षा जास्त काळ कोणत्याही व्यवहाराशिवाय पडून असलेली बँक खाती ‘निष्क्रीय खाती’ मानली जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, अशा खात्यांमधील जमा रक्कम Depositor Education and Awareness (DEA) Fund म्हणजेच ‘ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी’मध्ये वर्ग केली जाते.

निष्क्रीय खात्यातील पैसे परत कसे मिळवायचे?

तुमचं एखादं जुनं बँक खाते असेल किंवा घरातील एखाद्या सदस्याने अनेक वर्ष त्यांच्या खात्यात कोणतेही व्यवहार केले नसतील. तर अशा खात्यांमध्ये पडून असलेली रक्कम तुम्हाला परत मिळवता येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासाठी विशेष योजना सुरू केली आहे. ग्राहकांना त्यांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या अशा निष्क्रीय खात्यांचा शोध सहज घेता यावा यासाठी आरबीआयने UDGAM नावाचे केंद्रीय वेब पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर जाऊन तुम्ही एकाच ठिकाणी अनेक बँकांमधील अनक्लेम्ड डिपॉझिट्स शोधू शकता. यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी किंवा जन्मतारीख यांसारखी माहिती आवश्यक असते.