Bank strike 5 day work week Finance Ministry update : युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज (UFBU) या बँक कर्मचाऱ्यांच्या शिखर संघटनेने २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशभर संपाची हाक दिली आहे. बँक कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांच्या कामाचा आठवडा लागू करण्याची यात मुख्य मागणी आहे. मात्र, ५ दिवसांच्या कामाचा आठवडा लागू करण्याबाबत केंद्र सरकारने कोणतीही अधिकृत सहमती दर्शवली नव्हती, असा मोठा खुलासा वित्त मंत्रालयातील एका उच्चपदस्थ सूत्राने केला आहे. हा मुद्दा कधीही वेतन कराराच्या वाटाघाटीत चर्चेला आला नव्हता, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे बँक कर्मचारी संघटना काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे?

वाद नेमका कशामुळे सुरू झाला?

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनचे (AIBOC) सरचिटणीस रूपम रॉय यांच्या दाव्यानुसार, मार्च २०२४ मध्ये झालेल्या वेतन पुनरावृत्ती करारादरम्यान ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ (IBA) आणि बँक युनियन्सच्या संयुक्त मंचाने शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस सुट्टी देण्याबाबत सहमती दर्शवली होती. मात्र, वित्त मंत्रालयाच्या सूत्रांनी हा दावा फेटाळून लावला आहे. हा निर्णय एकतर्फी रेटण्याचा प्रयत्न संघटना करत असून, यावर सरकार किंवा आयबीएने कधीही अधिकृत मंजुरी दिली नसल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे.

कर्मचारी संघटना आणि सरकारमध्ये मतभेद

केवळ ५ दिवसांच्या कामाचा आठवडा लागू करण्यावरुन सरकार आणि बँक संघटनांमध्ये मतभेद नाहीत. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या सुधारित परफॉर्मन्स-लिंक्ड इन्सेंटिव (PLI) योजनेलाही युनियन्सचा विरोध आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत ८ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर सरकारने ही योजना चालू आर्थिक वर्षापुरती सध्या स्थगित केली आहे.
बँकिंग कर्मचाऱ्यांचे ९० टक्क्यांहून अधिक प्रतिनिधित्व करणाऱ्या AIBEA, AIBOC, NCBE, आणि BEFI यांसारख्या प्रमुख संघटनांनी जोपर्यंत ५ दिवसांच्या आठवड्याबाबत निश्चित कालमर्यादा दिली जात नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

रविवारीही बँका उघड्या राहणार

या देशव्यापी संपामुळे होणारी ग्राहकांची गैरसोय टळावी, यासाठी वित्त मंत्रालयाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना रविवार, २७ सप्टेंबर रोजी बँक शाखा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तरीही, २८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या संपामुळे एटीएम सेवा, चेक क्लिअरन्स आणि शाखांमधील दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.