लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून पुकारलेला तीन दिवसांचा संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू) २८, २९ आणि ३० सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली होती. मात्र, रविवारी रात्री इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) आणि यूएफबीयू यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संपासह नियोजित आंदोलनात्मक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सलग तीन दिवस बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आता टळली आहे.

रविवारी रात्री साडेनऊ वाजता आयबीए आणि यूएफबीयूच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. सविस्तर चर्चेनंतर बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर पुढील वाटाघाटी करण्याचे निश्चित करण्यात आले. उर्वरित सर्व शनिवार बँक कर्मचाऱ्यांसाठी सुट्टीचे दिवस घोषित करण्याच्या मुद्द्यावर विचार करण्यासाठी आयबीए आणि यूएफबीयूची उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष देविदास तुळजापूरकर यांनी दिली.

ही समिती विविध पर्यायांचा अभ्यास करणार असून, संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून बँक कर्मचारी आणि ग्राहक या दोघांच्या दृष्टीने स्वीकारार्ह तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले.

सध्या बँकांना प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी बँकांचे कामकाज सुरू असते. बँक कर्मचारी संघटनांकडून मात्र आठवड्यातील पाच दिवसच बँकांचे कामकाज सुरू ठेवावे आणि सर्व शनिवार सुट्टीचे दिवस घोषित करावेत, अशी मागणी दीर्घकाळापासून केली जात आहे. पाच दिवसांच्या बँकिंगचा मुद्दा मार्च २०२४मधील वेतनविषयक करारापासून प्रलंबित असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

याशिवाय, चतुर्थ श्रेणी आणि त्यावरील अधिकाऱ्यांसाठीच्या कामगिरीशी निगडित प्रोत्साहन योजनेच्या (पीएलआय) मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. कर्मचारी संघटनांनी या योजनेबाबत उपस्थित केलेल्या आक्षेपांचा विचार करून त्यात आवश्यक बदल सुचविण्यासाठी आयबीएसोबत चर्चा सुरू केली जाऊ शकते. त्यानंतर केंद्र सरकारकडे योजनेतील बदलांचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. तसेच ८ मार्च २०२४च्या बैठकीच्या इतिवृत्तात नमूद असलेल्या अन्य प्रलंबित मुद्द्यांवरही दोन्ही बाजूंमध्ये चर्चा करून ते लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या चर्चेत झालेल्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित आंदोलन आणि संप स्थगित करण्यास यूएफबीयूने सहमती दर्शविली. त्यामुळे २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत होणारा तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप आता टळला आहे.

यापूर्वी संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका रविवार, २७ सप्टेंबर रोजीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. रिझर्व्ह बँकेने बँक शाखा, कार्यालये, एटीएमशी संलग्न शाखा आणि चलन तिजोऱ्या रविवारी कार्यरत ठेवण्यास परवानगी दिली होती.

ग्राहकांना मोठा दिलासा

तीन दिवसांच्या संपामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखांमधील रोख व्यवहार, धनादेशाशी संबंधित कामकाज आणि अन्य प्रत्यक्ष शाखांमधील सेवांवर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, ऐनवेळी संप स्थगित झाल्याने महिनाअखेरीस बँकिंग व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.