Reach of banking services : देशातील प्रत्येक गावाच्या ५ किलोमीटरच्या परिघात आता बँक शाखा सुरू झाली आहे. यामुळे देशात बँकिंग सेवेची व्याप्ती ९९.९२ टक्के भागापर्यंत पोहोचली आहे, असा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत केला.

देशातील बँकिंग सेवेच्या विस्ताराबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर चौधरी बोलत होते. ते म्हणाले की, ‘जन धन दर्शक’ या उपयोजनावरील (ॲप) अद्ययावत आकडेवारीनुसार, देशातील ६ लाख १ हजार ३२८ गावांपैकी, ६ लाख ८६८ गावांच्या ५ किलोमीटर परिघात बँकांची किमान एक शाखा, त्यांचे व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) अथवा इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेचे (टपाल विभागाची बँक) केंद्र आहे. देशात बँकिंग सेवेचा वेगाने विस्तार होत आहे. देशात १७ जुलैपर्यंत बँकांच्या १.८१ लाख शाखा, १७.३६ लाख व्यवसाय प्रतिनिधी आणि १.६५ लाख इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेची केंद्रे होती. सध्या लोक वस्ती असलेल्या प्रत्येक गावाच्या ५ किलोमीटर परिघात बँकिंग सेवा सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात वित्तीय सेवा पोहोचविण्याचा हेतू यामागे आहे.

रिझर्व्ह बँकेने वाणिज्य बँक, लघु वित्तीय बँक, पेमेंट्स बँक, स्थानिक विभागीय बँक आणि ग्रामीण बँकांना देशात कुठेही शाखा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी २५ टक्के शाखा बँकिंग सुविधा नसलेल्या ग्रामीण भागात सुरू करण्याची अट आहे. देशात पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत असलेल्या बँक खात्यांची संख्या १७ जुलैपर्यंत ५८.७७ कोटी असून, या खात्यांमध्ये एकूण ३ लाख १२ हजार ४१४ कोटी रुपयांची रक्कम जमा आहे. याचबरोबर सरकारने कृषी कर्ज वितरणात सुधारणा करण्यासाठी डिजिटल उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे. यामुळे कर्ज वितरणात पारदर्शकता आली आहे, असे चौधरी यांनी नमूद केले.

सायबर सुरक्षेला बळ

सायबर सुरक्षा आणखी भक्कम करून आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. या अतंर्गत भारतीय डिजिटल देयक गुप्तचर महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून कृत्रिम प्रज्ञा (एआय), मशिन लर्निंग आणि बिग डेटा ॲनालिटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणुकीबाबत तातडीने माहिती आणि इशारे देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, असे चौधरी यांनी स्पष्ट केले.