Binance Crypto Hack market details: आभासी चलन अर्थात क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म असलेल्या बायनान्सला इतिहासातील सर्वांत मोठ्या चोरीचा फटका बसला आहे. या घटनेनंतर ग्राहकांनी कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरून तब्बल ३.६४ अब्ज डॉलरची क्रिप्टो मालमत्ता काढून घेतली आहे. गुरुवारी झालेल्या या सायबर हल्ल्यात ६.३ अब्ज डॉलरची मालमत्ता चोरीला गेल्याचे वृत्त आहे. या चोरीमागे उत्तर कोरियाशी संबंधित हॅकर्सचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सायबर हल्ल्यानंतर बायनान्सने व्यवहार तात्पुरते बंद केले होते. त्यानंतर रविवारी एक नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी व्यवहार आणि पैसे काढण्याची सुविधा टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्यात आली. व्यवहार सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांत ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे काढण्यास सुरुवात केली. कंपनीच्या माहितीनुसार, ग्राहकांनी सुमारे ४.६४९ अब्ज डॉलरची मालमत्ता काढली, तर १.०१ अब्ज डॉलरची नवीन मालमत्ता जमा केली. त्यामुळे निव्वळ बाहेर गेलेली रक्कम ३.६४ अब्ज डॉलर झाली.

बायनान्सने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने एक नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता (यूटीसी) पैसे काढण्याची सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू केली. दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत सुरुवातीच्या टप्प्यातील सर्व १५ नेटवर्क आणि मालमत्तांसाठी पैसे काढण्याची सुविधा पूर्ववत करण्यात आली. सुरुवातीला पैसे काढण्याचे प्रमाण मोठे होते; मात्र त्यानंतर व्यवहारांचे प्रमाण कमी होऊन स्थिरावले. नवीन ठेवींचा ओघ मात्र कायम राहिला.

ग्राहकांनी काढलेली ३.६४ अब्ज डॉलरची रक्कम बायनान्सच्या व्यवस्थापनाखालील एकूण १७१ अब्ज डॉलरच्या मालमत्तेच्या तुलनेत २.१ टक्के आहे. उर्वरित नेटवर्क आणि मालमत्तांसाठी व्यवहार पूर्ववत करण्यापूर्वी कठोर सुरक्षा चाचण्या सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

तीन अब्ज डॉलरची मालमत्ता गोठविली

सायबर हल्ल्यात झालेल्या नुकसानीची संपूर्ण भरपाई कंपनी स्वतः करणार असल्याचे बायनान्सने स्पष्ट केले आहे. चोरीला गेलेल्या मालमत्तेपैकी सुमारे तीन अब्ज डॉलरची मालमत्ता इतर क्रिप्टो कंपन्यांच्या सहकार्याने गोठविण्यात यश आल्याचे ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.

सायबर सुरक्षा क्षेत्रातील विश्लेषक आणि अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) या चोरीमागे उत्तर कोरियाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. उत्तर कोरियाशी संबंधित हॅकर्स यापूर्वीही क्रिप्टोकरन्सी कंपन्यांच्या डिजिटल पायाभूत सुविधांमधील त्रुटींचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर मालमत्ता चोरत असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, सायबर विश्लेषण क्षेत्रातील चेनॅलिसिस या संस्थेच्या मते, हल्लेखोरांनी सायबर हल्ल्याचा वेग वाढविण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला असण्याची शक्यता आहे. कमी कालावधीत हजारो व्यवहार प्रक्रिया करण्यात आल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

बायनान्सचे सहसंस्थापक चांगपेंग झाओ यांनी ग्राहकांचा विश्वास कठीण काळातील कंपनीच्या कृतीतून सिद्ध होतो, असे म्हटले आहे. तसेच चोरीनंतर नुकसानभरपाई देण्याच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी ग्राहकांना केले आहे.