Binance Crypto 6.3 Billion Dollar Theft: जगातील सर्वात मोठा क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज बायनान्स सायबर हल्ला झाला असून, यात हॅकर्सनी अंदाजे ६.३ अब्ज डॉलर्सची रक्कम चोरली असण्याची शक्यता आहे. याचे भारतीय चलनात सुमारे ५५.८ हजार कोटी रुपये इतके मूल्य होते. ही घटना आतापर्यंतची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी चोरी ठरू शकते, ज्यामुळे डिजिटल ॲसेट एक्सचेंजवरील निधीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत द वॉल स्ट्रीट जर्नलने वृत्त दिले आहे.
मात्र, बायनान्सने चोरी झालेली रक्कम अंदाजित असल्याचे म्हटले असून, ६.३ अब्ज डॉलर्सची चोरी झाल्याच्या वृत्ता दुजोरा दिला नाही. ३० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात बायनान्सने म्हटले आहे की, या घटनेचा एकूण अंदाजित परिणाम सुमारे ६.३ अब्ज डॉलर्स इतका आहे, तर बाधित मालमत्तेपैकी सुमारे ३ अब्ज डॉलर्सची मालमत्ता ‘ऑन-चेन’ स्तरावर गोठवण्यात आली आहे.
ब्लॉकचेन विश्लेषण कंपनी चेनॲनालिसिसने स्वतंत्रपणे दुजोरा दिला आहे की, गुरुवारी रात्री ८:३० पर्यंत किमान ५.९१२ अब्ज डॉलर्सची चोरी झाली होती. चोरी झालेल्या उर्वरित मालमत्तेचा अद्याप पूर्ण हिशोब लागलेला नाही.
गुंतवणूकदारांना कोण भरपाई देणार?
बायनान्सने ग्राहकांना आश्वासन दिले आहे की त्यांचे पैसे सुरक्षित आहेत आणि सर्व नुकसान भरून काढण्यासाठी ते त्यांच्या ‘सिक्युअर ॲसेट फंड फॉर युझर्स’ आणि कंपनीच्या निधीचा वापर करतील. पण, या घटनेची चौकशी होईपर्यंत, वॉलेट पायाभूत सुविधा सुरक्षित करेपर्यंत आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था व ब्लॉकचेन गुप्तचर भागीदारांसोबत काम करेपर्यंत, कंपनीने ठेवी आणि पैसे काढण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे.
कशी झाली चोरी?
शुक्रवारी कंपनीने निवेदनात म्हटले की, “बायनान्सच्या प्राथमिक तपासानुसार, या घटनेत ‘डेव्हऑप्स’ (DevOps) इंजिनिअरच्या लॅपटॉपशी तडजोड झाली असण्याची शक्यता आहे.”
चोरीमागे उत्तर कोरियाचे हॅकर्स
बायनान्सच्या ६.३ अब्ज डॉलर्सच्या क्रिप्टो चोरीमागे उत्तर कोरियाचे हॅकर्स होते, असे अमेरिकेच्या ब्लॉकचेन विश्लेषण कंपनी टीआरएम लॅब्सने ३० ऑक्टोबर रोजी सांगितले. त्यांनी या हल्ल्यामागे उत्तर कोरियाचा ‘ट्रेडरट्रेटर’ हा ग्रुप असल्याचे म्हटले आहे.
एका ब्लॉग पोस्टमध्ये कंपनी टीआरएम लॅब्सने म्हटले, “एका हल्लेखोराने दहा ब्लॉकचेनवरील बायनान्स वॉलेट्समधून सुमारे ६.३६ अब्ज डॉलर्सची रक्कम हलवली. यातील बहुतांश रक्कम अवघ्या २० मिनिटांत काढण्यात आली. ऑन-चेन आणि ऑफ-चेन माहितीच्या आधारे टीआरएम या हल्ल्यामागे उत्तर कोरियाचा हॅकिंग ग्रुप ‘ट्रेडरट्रेटर’ असल्याचा निष्कर्ष काढत आहे. आम्हाला या निष्कर्षाबद्दल पूर्ण खात्री आहे.”
