Biocompute startup shifting to San Francisco due to global deep tech ecosystem: बंगळूरुस्थित डीएनए डेटा स्टोरेज स्टार्टअप ‘बायोकम्प्युट’ प्रायोगिक टप्प्यातून उत्पादनाकडे वाटचाल करत असल्याने सॅन फ्रान्सिस्को येथे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थापक अनघा राजेश यांनी सांगितले की, कंपनीला भांडवल, कुशल मनुष्यबळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मोठी जोखीम पत्करण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांची आवश्यकता आहे.

“डीएनए डेटा स्टोरेजसारख्या अत्यंत आव्हानात्मक समस्येवर काम करणारी आम्ही भारतातील पहिलीच प्रयोगशाळा (लॅब) आहोत आणि गेल्या दोन वर्षांत भारतातील संसाधनांचा वापर करून आम्ही या तंत्रज्ञानाचा ‘एंड-टू-एंड’ प्रोटोटाइप विकसित केला आहे”, असे अनघा राजेश यांनी एका ब्लॉगपोस्टमध्ये लिहिले.

“आता एका मोठ्या बदलाची वेळ आली आहे. ‘बायोकम्प्युट’ चिप्सच्या पहिल्या आवृत्तीची (V1) निर्मिती सुरू करत असतानाच, आम्ही सॅन फ्रान्सिस्कोला स्थलांतर करत आहोत. जेणेकरून जगातील ‘स्टार्टअप राजधानी’ मानल्या जाणाऱ्या या शहरात उपलब्ध असलेले भांडवल, कौशल्य आणि ग्राहकांची जोखीम पत्करण्याची तयारी या गोष्टींचा आम्हाला लाभ घेता येईल”, असे त्यांनी पुढे नमूद केले.

कंपनी आता आपली पहिली ‘डीएनए डेटा स्टोरेज चिप’ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करेल. या स्थलांतरामुळे ‘बायोकम्प्युट’चे बेंगळुरू येथील कामकाज संपुष्टात येईल आणि तेथील स्थानिक टीमलाही कंपनी सोडावी लागेल.

बायोकम्प्युट भारताबाहेर का जात आहे?

अनघा राजेश यांनी सांगितले की, या निर्णयामागे कुशल मनुष्यबळाची कमतरता हे कारण नसून, व्यावसायिक वातावरण हे मुख्य कारण आहे.

“जरी भारत आता RDI फंड आणि इतर माध्यमांतून डीप-टेक क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात करत असला, तरी आमच्या उत्पादनासाठी येथील वातावरण अजून तयार आहे, असे आम्हाला वाटत नाही. पाश्चात्य देशांमध्ये काय विकसित झाले आहे हे पाहून, त्यानुसार आपल्या सामाजिक-सांस्कृतिक आणि आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची भारताची सहसा पसंती असते”, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

“परंतु, आधुनिक काळातील डेटा स्टोरेज हार्डवेअर कंपनी उभारण्यासाठी आणि IBM सारख्या बलाढ्य कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी, आम्हाला अशा वातावरणाची गरज आहे जे विपुलतेवर आधारलेले असेल आणि जिथे उच्च जोखीम व उच्च परतावा देणाऱ्या निर्णयांचे धाडस केले जाईल”, असेही राजेश यांनी नमूद केले.

१०० हून अधिक स्टार्टअप्स भारताबाहेर

अनघा राजेश यांचा स्थलांतराचा निर्णय हा देशातील डीप-टेक आणि एआय स्टार्टअप्समधील एका प्रवाहाचाच भाग आहे. ग्राहक, व्हेंचर कॅपिटल आणि आघाडीच्या एआय इकोसिस्टम्सपर्यंत सहज पोहोचता यावे म्हणून १०० हून अधिक भारतीय एआय संस्थापक अमेरिकेत स्थलांतरित झाले आहेत किंवा त्याची योजना आखत आहेत.