Jeremy Grantham Bitcoin Price Prediction: अब्जाधीश गुंतवणूकदार जेरेमी ग्रँथम यांनी नुकतेच बिटकॉइनची किंमत “नक्कीच” शून्यावर येईल असे म्हटले होते. आता त्यांच्या या भाकितावर क्रिप्टोकरन्सी विश्लेषक मायकल व्हॅन डी पोपे यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे. व्हॅन डी पोप्पे यांनी ही टिप्पणी “मूर्खपण” असल्याचे म्हणत “दिग्गज” गुंतवणूकदाराकडून हे अपेक्षित नव्हते, असे नमूद केले. याचबरोबर त्यांनी स्पष्ट केले की, अनेक दिग्गज बिटकॉइनची मूलभूत तत्वे (फंडामेंटल्स) आणि उद्देश समजून घेण्यात अयशस्वी ठरले आहेत.
जेरेमी ग्रँथम यांच्या बिटकॉइनची किंमत शून्य होणार या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना क्रिप्टोकरन्सी विश्लेषक मायकल व्हॅन डी पोपे म्हणाले, “एका महान गुंतवणूकदाराची ही केवळ एक मूर्खपणाची पोस्ट आहे. अनेक दिग्गज वयोवृद्ध व्यक्तींना बिटकॉइन म्हणजे काय आणि ते कसे काम करते याची काहीच कल्पना नसते. त्यामुळेच जेव्हा ते अशी विधाने करतात, तेव्हा ती हास्यास्पद वाटतात.”
ग्रँथम नेमकं काय म्हणाले होते?
जेरमी ग्रेंथम यांनी बिटकॉइनची किंमत शून्यावर येईल असे भाकित २५ जून रोजी प्रसारित झालेल्या ‘द डायरी ऑफ अ सीईओ’ या पॉडकास्टदरम्यान केले होते. यात पॉडकास्टर स्टीव्हन बार्टलेट यांनी ग्रँथम यांना विचारले होते की, बिटकॉइनचे मूल्य शून्य होईल असे त्यांना वाटते का?
यावर उत्तर देताना जेरमी ग्रँथम म्हणाले, “भविष्यात बिटकॉइनचे मूल्य नक्कीच शून्यावर येईल. पण त्यासाठी बराच काळ लागू शकतो.”
यावेळी ग्रँथम यांनी क्रिप्टोकरन्सीचे वर्णन “निरर्थक आणि फालतू गोष्ट” असे केले. त्यांच्या मते, “गुन्हेगारांना कोणाच्याही नजरेस न पडता पैसे हलवता यावेत, यापलीकडे तिचा कोणताही उपयोग होत नाही.” आपल्याकडे कधीही कोणतीही क्रिप्टोकरन्सी नव्हती आणि ती खरेदी करण्याची शिफारस आपण कोणालाही कधीच करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
जेरमी ग्रँथम हे जीएमओ या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचे संस्थापक आहेत. याचबरोबर त्यांनी दिग्गज गुंतवणूकदार म्हणूनही नाव कमावले आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धातील ‘डॉट-कॉम’ तेजी आणि २००८ चे जागतिक गृहनिर्माण व आर्थिक संकट यांसारख्या मालमत्ता क्षेत्रातील मोठ्या ‘बबल्स’चा त्यांनी अचूक अंदाज वर्तवला होता.
बिटकॉइनची सध्याची परिस्थीती
महागाईचा दबाव कमी झाल्याबाबत फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांनी केलेल्या विधानानंतर, १ जुलै २०२६ रोजी बिटकॉइनची किंमत काही काळासाठी ५७,८०३ डॉलर्सच्या २२ महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरली आणि त्यानंतर ती पुन्हा ६०,००० डॉलर्सच्या वर पोहोचली.
या सुधारणेनंतरही वर्षाच्या सुरुवातीपासून बिटकॉइनच्या मूल्यात ३२ टक्क्यांची घट झाली आहे आणि ६०,००० डॉलर्सच्या खाली त्यावर विक्रीचा दबाव कायम आहे. जून महिन्यात अमेरिकेतील ‘स्पॉट बिटकॉइन ईटीएफ’मधून ४.५ अब्ज डॉलर्सची विक्रमी मासिक रक्कम काढून घेण्यात आली आहे. उच्च व्याजदर आणि बाजाराचा बदललेला कल यांमुळे गुंतवणूकदारांमध्ये असलेली सावधगिरीची भूमिका यातून दिसून येते.
महागाईचे प्रमाण २ टक्क्यांवर आणण्याच्या फेडच्या धोरणामुळे भविष्यात सावधगिरीचे मौद्रिक धोरण अवलंबले जाण्याचे संकेत मिळत आहेत, ज्याचा परिणाम बिटकॉइनच्या भविष्यातील वाटचालीवर होत आहे.
