मुंबईः इस्रायल-इराण तणावामुळे खनिज तेलाच्या किमती १०० डॉलरच्या वर, तर भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता गेले पाचहून अधिक गुंतवणूकदारांची कसोटी पाहत आहे. या पार्श्वभूमीवर बोफा सिक्युरिटीज या जागतिक दलाली पेढीने निफ्टी ५० निर्देशांकाबाबत ताजे टिपण सोमवारी प्रसिद्ध केले. तिने निफ्टीसाठी त्यांचे डिसेंबर २०२६ चे उद्दिष्ट सुधारून २७,५०० ते २८,१०० च्या दरम्यान ठेवले आहे. मात्र, या प्रवासात तिने गुंतवणूकदारांसाठी काही महत्त्वाचे सावधगिरीचे इशारेही दिले आहेत.

या अंदाजात घटीमागे महागाई आणि आर्थिक मंदीच्या दुहेरी संकटांचे कारण बोफाने प्रामुख्याने दिले आहे. ‘निफ्टी ५०’ या प्रमुख निर्देशांकातील कंपन्यांच्या आर्थिक वर्ष २०२७ मधील कमाईच्या वाढीचा अंदाज ‘बोफा सिक्युरिटीज’ने घटवला आहे. इराण संघर्षापूर्वी १४ टक्के इतका वर्तवण्यात आलेला हा अंदाज आता कमी करून ८.५ टक्के करण्यात आला आहे. थेट फटका बसणाऱ्या क्षेत्रांमध्ये निफ्टीमधील एनर्जी आणि ऑटो कंपन्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्या उलट बँकिंग आणि आयटी क्षेत्र निफ्टीला सावरण्याचे काम करतील, असे तिचे म्हणणे आहे.

आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील देशाच्या जीडीपी वाढीचा अंदाज पूर्वीच्या ७.४ टक्क्यांवरून तिने कमी करून ६.५ टक्के केला आहे. पश्चिम आशियातील संघर्ष दीर्घकाळ चालू राहण्याच्या सर्वात वाईट परिस्थितीच्या शक्यतेत जीडीपी वाढीला तीन टक्क्यांची कात्री लागू शकते, तर कंपन्यांच्या कमाईची वाढ शून्यावर येण्याची शक्यताही तिने व्यक्त केली आहे. या दलाली पेढीने डिसेंबर अखेरसाठी निफ्टीचे लक्ष्य २६,२०० निश्चित केले आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

बोफाने सावध केले आहे की, भारतीय बाजार ताज्या पडझडीनंतरही, सध्या त्याच्या ऐतिहासिक सरासरीपेक्षा महाग पातळीवर आहे. त्यामुळे, नवीन गुंतवणूकदारांनी एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी ‘बाय ऑन डिप्स’ म्हणजेच मार्केट पडल्यावर खरेदी करण्याचे धोरण ठेवावे.
 अमेरिकी फेडरल रिझर्व्हने जर व्याजाचे दर अपेक्षेप्रमाणे कमी केले नाहीत, तर परकीय गुंतवणूकदार भारतातून पैसे काढून घेऊ शकतात. अशा स्थितीत निफ्टीला २३,८०० ते २४,२०० च्या स्तरावर भक्कम आधार असल्याचे बोफाचे निरीक्षण आहे.

दरम्यान, बोफाच्या अंदाजाप्रमाणे बँक क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या जोरदार खरेदीने सोमवारी (६ एप्रिल) शेअर बाजारात तेजीला बळ दिले. सुरुवात मोठ्या घसरणीने करणारे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी उत्तरार्धात चांगली वाढ दर्शवत बंद झाले. चढ-उतारांनी भारलेल्या अस्थिर सत्रात, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७८७.३० अंशांनी, म्हणजेच १.०७ टक्क्यांनी वधारला आणि दिवसअखेर ७४,१०६.८५ या पातळीवर स्थिरावला. व्यवहारादरम्यान, हा निर्देशांक ८८७.९१ अंशांनी वधारून ७४,२०७.४६ या उच्चांकावर पोहोचला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५५.१५ अंशांनी, म्हणजेच १.१२ टक्क्यांनी वधारला आणि २२,९६८.२५ या पातळीवर बंद झाला.

युद्धविरामाच्या प्रयत्नांविषयीच्या वृत्तांमुळे तेलाच्या किमतीत किंचित नरमाई आली. ‘ब्रेंट क्रूड’ पिंपामागे ११० डॉलरवरून, १०७ डॉलरवर उतरले. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खालच्या पातळ्यांवर बाजाराला सातत्याने स्थैर्य प्रदान केले आहे. त्यांच्याकडून बाजाराच्या सर्वच क्षेत्रांमध्ये मूल्याधारित खरेदीला (व्हॅल्यू बाईंग) गती मिळाल्यामुळे शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. बँकिंग क्षेत्रातील उत्साहवर्धक आकडेवारीमुळे व्याजदरांशी संवेदनशील असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूकदारांचा रस वाढल्याचे दिसले, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नमूद केले.