वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सरकारी मालकीची महारत्न तेल कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) ब्राझीलच्या पेट्रोब्राससोबत २०२७ मध्ये १.२० कोटी पिंप तेल खरेदीचा करार केल्याचे सरकारने शुक्रवारी दिलेल्या निवेदनाद्वारे स्पष्ट केले. हा करार ७८ कोटी डॉलरला झाला असून २०२६ मधील कराराच्या तुलनेत तो दुपटीने मोठा आहे.

सध्याच्या अमेरिकी आयात शुल्कामुळे भारतीय तेल कंपन्या आयात धोरणांमध्ये बदल करत आहेत आणि रशियन तेलाच्या पुरवठ्यातील कपात भरून काढण्यासाठी आखाती देश, आफ्रिकी देश आणि दक्षिण अमेरिकी देशांकडून अधिक तेल खरेदी करत आहेत. बीपीसीएल आणि ब्राझीलच्या राष्ट्रीय तेल कंपनीमधील या करारावर आगामी आठवड्यात ‘इंडिया एनर्जी वीक’ परिषदेत स्वाक्षरी केली जाणार आहे.

येत्या २७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या चार दिवसीय परिषदेत, सरकारी मालकीची नुमालीगढ रिफायनरी (एनआरएल) २०० किलो टन क्षमतेचा शाश्वत विमान इंधन प्रकल्प उभारण्यासाठी फ्रान्सच्या टोटलएनर्जीजशी प्राथमिक करार करेल. याव्यतिरिक्त, एनआरएल आणि ऑइल इंडिया लिमिटेड या दोन भारतीय कंपन्या टोटलएनर्जीजकडून द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) खरेदीचा करार करतील. तर, बीपीसीएलची एक उपकंपनी भारतपेट्रो रिसोर्सेस लिमिटेड, जगभरातील तेल आणि वायू कंपन्यांमध्ये हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी शेलसोबत करार करणार आहे.

तिमाही नफ्यात ८९ टक्के वाढ

बीपीसीएलने ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत ७,१८८.४ कोटी रुपयांचा नफा नोंदवला. गेल्या वर्षी याच तिमाहीतील ३,८०५.९४ कोटींच्या नफ्याच्या तुलनेत यंदाची वाढ ८८.८७ टक्क्यांची आहे. कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर ७.१३ टक्क्यांनी वाढून १.३६ लाख कोटींवर पोहोचला आहे. कंपनीने प्रति समभाग १० रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. यासाठी २ फेब्रुवारी रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली असून, २१ फेब्रुवारीपर्यंत लाभांश भागधारकांच्या खात्यात जमा केला जाईल.

शेअर वधारणार?

शुक्रवारच्या सत्रात बीपीसीएलचा समभाग १.२६ टक्क्यांनी घसरून ३४९.७० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे १.५१ लाख कोटींचे बाजार भांडवल आहे. बीपीसीएलच्या शेअरने वर्षभरात २८.७२ टक्के आणि तीन वर्षात ९९.७४ टक्के परतावा दिला आहे. जिओजित बीएनपी परिबास या दलाली पेढीने समभाग खरेदीची शिफारस केली असून समभागाचे ४०० रुपयांचे लक्ष्य दिले आहे.