पीटीआय, जयपूर
रशिया, ब्राझील, चीनचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ देशांच्या स्वतंत्र चलनाच्या बाजूने भारत नाही आणि अशा कोणत्याही योजनेचे समर्थन करत नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी येथे मांडली.
गेल्या काही वर्षांपासून चीन आणि रशिया यांसारखे सदस्य देश अमेरिकी डॉलरला पर्याय म्हणून किंवा स्वतंत्र ‘ब्रिक्स चलन’ निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा पार्श्वभूमीवर गोयल यांनी भारताची म्हणून स्पष्ट केलेली भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. वर्ष २०२४ मध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना अमेरिकी डॉलरची जागा घेण्याच्या कोणत्याही हालचालीविरोधात इशारा दिला आहे.
आशियाई, आफ्रिकी आणि लॅटिन अमेरिकेतील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांची संघटना असलेल्या ‘ब्रिक्स’मध्ये भारतासह, ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या ११ देशांचा समावेश आहे. जागतिक व प्रादेशिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर तसेच आंतरराष्ट्रीय राजकीय आणि आर्थिक धोरणांवर चर्चा आणि सहकार्य करण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
ब्रिक्सच्या सदस्य देशांमध्ये संतुलित व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या मार्गांवर उपस्थित मंत्र्यांनी चर्चा केली. शिवाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) सोप्या पद्धतीने आणि पुरेसा वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबतही मंत्र्यांनी विशेष विचारविनिमय केला, असे गोयल यांनी सांगितले.
