मुंबई : देशातील प्रमुख निर्देशांक निफ्टी ५० मध्ये मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईच्या येत्या सप्टेंबरमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. बीएसईच्या शेअरमध्ये बुधवारच्या सत्रात तब्बल ४ टक्के वाढ होऊन त्याने ४,१३४ ची नवी उच्चांकी पातळी गाठली आहे.क्विडिटी ॲडव्हायझर्स’ या रिसर्च फर्मच्या अहवालानंतर गेल्या दोन दिवसांत या शेअरमध्ये ८ टक्के तेजी आली आहे. या अहवालानुसार, सप्टेंबर २०२६ च्या निर्देशांक पुनर्रचनेमध्ये आशियातील या सर्वात जुन्या बाजार मंचाचा अर्थात स्टॉक एक्स्चेंजचा समावेश निफ्टी ५० मध्ये होऊ शकतो.

या तेजीमागील प्रमुख कारणे काय?

निफ्टी ५० मध्ये समावेश झाल्यानंतर बऱ्याच म्युच्युअल फंड कंपन्यांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये नव्याने समावेश झालेल्या कंपनीचे समभाग घ्यावे लागतात. त्यामुळे आता बीएसईमध्ये ठ्या गुंतवणुकीची शक्यता आहे. बीएसईचा निफ्टी ५० मध्ये समावेश झाल्यास, या शेअरमध्ये सुमारे ६३९ दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास ५,३०० कोटी रुपये इतकी मोठी परदेशी/पॅसिव्ह गुंतवणूक होऊ शकते.

बीएसई कोणाची जागा घेणार?या पुनर्रचनेत बीएसई आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोची जागा घेण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात विप्रोच्या शेअरमध्ये २५ टक्क्यांची घसरण झाली आहे. विप्रो निर्देशांकामधून बाहेर पडल्यास तिथून २०६ दशलक्ष डॉलरचा निधी बाहेर जाऊ शकतो. निफ्टी ५० मध्ये येण्यासाठी कंपनीचे सरासरी फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन सध्याच्या सर्वात लहान घटकापेक्षा किमान १.५ पट अधिक असावे लागते. बीएसईने हा निकष यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

सरलेल्या आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत बीएसईचा निव्वळ नफा ६१ टक्क्यांनी वाढून ७९५.४७ कोटी झाला आहे, तर संपूर्ण वर्षाचा नफा ८८ टक्क्यांनी वाढून २,४८७ कोटीवर पोहोचला आहे.

बीएसईची दमदार कामगिरी

गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग, ट्रेडिंगमधील तेजी आणि वीकली डेरिव्हेटिव्ह्ज विभागातील दमदार कामगिरीमुळे बीएसईचा शेअर २०२६ मध्ये आतापर्यंत ५५ टक्क्यांपेक्षा अधिक आणि गेल्या एका वर्षात ६४ टक्क्यांपेक्षा जास्त वधारला आहे. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईकडून या पुनर्रचनेची अधिकृत घोषणा ऑगस्टमध्ये केली जाईल आणि हे बदल सप्टेंबर २०२६ च्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी लागू होतील.