BSNL Revenue : एक काळ असा होता की सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी ‘बीएसएनएल’ बंद पडण्याच्या मार्गावर होती. मात्र, गेल्या दोन वर्षात बीएसएनएलने जोरदार पुनरागमन करत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. गेल्या दोन वर्षांत योग्य व्यवस्थापन आणि तांत्रिक सुधारणांमुळे कंपनीचा महसूल तब्बल १९ टक्क्यांनी वाढून २५,००० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी कंपनीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. बीएसएनएलचा हा कायापालट सरकारी टेलिकॉम क्षेत्राला संजीवनी देणारा ठरणार आहे.

महसूलात २५ टक्क्यांची वाढ

केंद्रीय राज्यमंत्री पेम्मासानी यांनी बीएसएनएलच्या आर्थिक सुधारणेचे कौतुक करताना सांगितले की, “कंपनीचा महसूल दोन वर्षांत २१,००० कोटी रुपयांवरून वाढून २५,००० कोटी रुपये झाला आहे, ही जवळपास २० ते २५ टक्क्यांची मजबूत वाढ आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या ‘ईबीआयटीडीए’ (व्याज, कर आणि घसारापूर्व नफा) मध्ये झालेली वाढ थक्क करणारी आहे. पूर्वी अवघा ५० कोटी रुपये असलेला ईबीआयटीडीए आता थेट ७,००० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, बीएसएनएलने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २३,४२७ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २१,३०२ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न नोंदवले होते.

१. ५०,००० टॉवर्सचा कायापालट

बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये सुधारणा करण्यासाठी जमिनीवर मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये टॉवरचा कार्यकाळ पूर्वी केवळ ७५ टक्के होता, तो वाढवून ९५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. देशभरातील तब्बल ५०,००० टॉवर्समधील ५०,००० बॅटऱ्या बदलण्यात आल्या आहेत. तसेच पॉवर प्लांट्स अत्याधुनिक करण्यात आले असून जुन्या केबल्स काढून नवीन केबल्स टाकण्यात आल्या आहेत. या सुधारणांनंतर प्रत्येक सर्कल आणि राज्य पातळीवर व्यावसायिक व्यवसाय आणि नवीन मोबाईल कनेक्शनसाठी पद्धतशीर टार्गेट निश्चित करण्यात आले.

२. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अवघ्या १ रुपयात सिम कार्ड

खाजगी दूरसंचार कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे प्लॅन्स आणि दर अत्यंत स्वस्त असल्याचे पेम्मासानी यांनी नमूद केले. ते म्हणाले, “आम्ही भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून अवघ्या १ रुपयात सिम कार्ड उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून ग्राहकांना आमची सेवा स्वस्तात मिळेल. ग्रामीण भागात घरोघर जाऊन जनजागृती करण्यासाठी आम्ही पोस्टमन आणि डाक कर्मचाऱ्यांची मदत घेत आहोत. ज्या गावांमध्ये बीएसएनएल हा एकमेव आणि विश्वासार्ह पर्याय आहे, तिथे लोकांनी याचा नक्कीच लाभ घेतला पाहिजे.”

३. स्वदेशी ‘4G’ तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील ५ वा देश!

बीएसएनएलने केवळ एका वर्षात १,००,००० टॉवर्सवर पूर्णपणे स्वदेशी 4G सेवा सुरू करून एक जागतिक विक्रम केला आहे. हे तंत्रज्ञान आता आंतरराष्ट्रीय मानकांच्या समकक्ष विकसित झाले आहे. या यशासह भारत आता स्वतःचे स्वदेशी 4G तंत्रज्ञान विकसित करणारा जगातील पाचवा देश बनला आहे, जी देशासाठी अत्यंत अभिमानास्पद कामगिरी आहे.