Burj Khalifa founder Mohamed Alabbar hails Indian employees work ethic: जगभरातील कंपन्या आपल्या कुशल कर्मचाऱ्यांच्या धोरणांचा पुनर्विचार करत असताना, मोहम्मद अलाब्बार यांनी अनुभवावर आधारित एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन मांडला आहे. “जर तुम्हाला जागतिक स्तरावर एखादी गोष्ट निर्माण करायची असेल, तर कुशल भारतीय कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवा”, असे त्यांनी म्हटले आहे.

अबुधाबी येथे आयोजित ‘Make it in the Emirates’ परिषदेत बोलताना, ‘बुर्ज खलिफा’च्या उभारणीमागील या द्रष्ट्या व्यक्तीने असे एक तत्त्वज्ञान मांडले, जे केवळ रचना (Design), भांडवल किंवा व्याप्ती (Scale) यांपलीकडे जाणारे आहे.

अलाब्बार म्हणाले की, प्रत्यक्ष अंमलबजावणीतील खरी निर्णायक धार केवळ रचनेतून (डिझाइनमधून) येत नाही, तर अशा लोकांकडून येते जे सर्वात महत्त्वाच्या क्षणी तुमच्याबरोबर खंबीरपणे उभे राहतात.

ते भारतीय कर्मचाऱ्यांना विशेष पसंती देतात, कारण त्यांच्या मते त्यांची कार्यशैली “जगात सर्वोत्तम” आहे.

त्यांनी सांगितले की, ते सातत्याने भारतीय कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य देतात, कारण त्यांच्या मते भारतीय कर्मचाऱ्यांची कार्यशैली जागतिक स्तरावर सर्वात मजबूत आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की, इतर लोक कामावर नसताना, कुशल भारतीय कर्मचारी दबावाखाली अधिक चांगल्या प्रकारे काम करतात, परिस्थितीशी जुळवून घेतात आणि उत्कृष्ट कामगिरी करतात.

मोहम्मद अलाब्बार यांनी भारतीय कर्मचाऱ्यांच्या या कार्यशैलीचे ‘पॉझिटिव्ह पॅरानोइया’ (सकारात्मक संशयखोरपणा) असे वर्णन केले, जी जोखीम, अंमलबजावणी आणि गुणवत्ता यांबाबत सतत सतर्क राहण्याची एक मानसिकता आहे.

भारताविषयीचा अलाब्बार यांचा व्यापक दृष्टिकोनही तितकाच ठाम आहे. देशाचा विस्तार, स्थिरता आणि विकासाचा आलेख अधोरेखित करत त्यांनी उपस्थितांना सांगितले, “भारतापेक्षा अधिक उत्तम, विशाल, स्थिर आणि सातत्याने प्रगती करत राहणारा दुसरी कोणता देश आहे का? मुळीच नाही.”

मोहम्मद अलाब्बार कोण आहेत?

मोहम्मद अलाब्बार यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९५६ रोजी संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे झाला. ते स्थावर मालमत्ता (Real Estate) आणि व्यवसाय क्षेत्रातील एक आघाडीचे व्यक्तिमत्त्व आहेत. ‘एमार प्रॉपर्टीज’चे संस्थापक आणि दुबईच्या नागरी स्वरूपाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे अलाब्बार यांचे योगदान खरोखरच अमूल्य आहे.

१९९७ मध्ये, मोहम्मद अलाब्बार यांनी ‘एमार प्रॉपर्टीज’ या कंपनीची स्थापना केली. या कंपनीने दुबईच्या वास्तुकलेचा पूर्णपणे कायापालट करून टाकला. त्यांच्या नेतृत्वाखाली, एमारने शहरांमधील काही अत्यंत प्रतिष्ठित वास्तूंची उभारणी केली. ज्यामध्ये जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या ‘बुर्ज खलिफा’ आणि ‘दुबई मॉल’ यांचा समावेश आहे.