Best Career Advice regarding the flaws of Tom Rath Passion Theory for young professionals: तुम्ही पहिल्यांदा नोकरी शोधत असाल किंवा करिअरच्या मध्यात नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तरी तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी करा (पॅशन फॉलो करा) असा सल्ला नक्कीच अनेकजन देतील. पण, तसे करू नका. “पॅशनच्या बाबतीत एक गोष्ट कोणीही सांगत नाही, ती तुमचे करिअर सुरू होण्याआधीच संपवते”, असे गॅलप रिसर्चचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि करिअर सल्लागार लेखक टॉम राथ यांनी म्हटले आहे. याहू फायनान्सच्या स्तंभलेखिका केरी हॅनन यांच्याशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
टॉम राथ यांचा ‘पॅशन’ न जोपासण्याचा विचार हा एक नवा दृष्टिकोन देणारा आणि काहीसा धक्कादायक वाटणारा आहे. त्यांच्या मते, स्वतःमधील बलस्थाने आणि ‘परिपूर्ण पॅशन’ शोधण्याच्या फंदात न पडता, त्याऐवजी तुमचे बॉस आणि सहकारी यांच्यासह इतरांसाठी काम आणि जीवन अधिक चांगले कसे करता येईल, यावर लक्ष केंद्रित करा. केवळ स्वतःचाच विचार करणारा करिअरचा मार्ग निवडल्यामुळे करिअर भरकटू शकते.
लोक त्यांच्या कारकिर्दीच्या मध्यात आणि उत्तरार्धातील टप्प्यांवर, सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे परिस्थिती काहीही असली तरी सतत अधिक मिळवण्याच्या मागे धावणे. आपल्याला असे वाटते की, जर आपण आपले उत्पन्न दुप्पट केले, तर आपल्याला मिळणारा आनंदही दुप्पट होईल. पण वास्तवात, उत्पन्न दुप्पट होण्याचा आणि त्या प्रमाणात सुखात किंवा समाधानात वाढ होण्याचा काहीही संबंध नसतो. उलट, यामुळे तुमच्या नातेसंबंधांवर आणि कुटुंबासोबत घालवल्या जाणाऱ्या वेळेवर परिणाम होऊ शकतो. सैद्धांतिकदृष्ट्या विचार केला तर, उत्पन्न दुप्पट होते तेव्हा तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या येतात, तुम्हाला अधिक लोकांचे व्यवस्थापन करावे लागते, अधिक काम करावे लागते आणि अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. – टॉम राथ
टॉम राथ यांच्याशी संवाद साधथाना केरी हॅनन यांनी त्यांना विचारले की, करिअरची निवड करण्यापूर्वी, आपल्या आवडीच्या क्षेत्राबाबत एखाद्या ‘वेक अप कॉल’ची वाट पाहणे लोकांनी का थांबवावे?
यावर उत्तर देताना टॉम राथ म्हणाले, “पदवीधर होणाऱ्या नवीन तरुणांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्राबाबत करिअरचा सल्ला देण्याची इच्छा प्रत्येकाला असते. परंतु यात सुरुवातीपासूनच एक मोठी समस्या असते. कारण, आपण जेव्हा महाविद्यालय आणि अभ्यासाचा विषय निवडतो आणि प्रत्यक्ष नोकरीच्या जगात पाऊल टाकून पहिली नोकरी स्वीकारतो, तेव्हा उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या नोकऱ्यांपैकी केवळ ३% ते ५% नोकऱ्यांचीच आपल्याला माहिती झालेली असते.”
वास्तव समोर येताच पॅशन नाहीशी होते
“नवीन पदवीधर अनेकदा केवळ एका छोट्याश्या दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहत असतात. जसे की त्यांच्या पालकांनी कोणत्या क्षेत्रात काम केले किंवा भविष्यात कुठे जास्त पगार मिळू शकेल. थोडक्यात, त्यांना उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधींची पूर्ण कल्पना नसते आणि माहितीच्या या व्याप्तीमध्ये मोठी तफावत असते”, असे त्यांनी नमूद केले.
टॉम राथ पुढे म्हणाले, “पॅशन म्हणजे कापसासारखी असते, जी वास्तव समोर येताच क्षणात नाहीशी होते. कठीण काळात ही आवड आपल्याला तारून नेईल अशी लोकांची अपेक्षा असते, पण जेव्हा काम कठीण होऊ लागते, तेव्हा नेमकी हीच आवड नाहीशी होते.”
