CBI arrests RCom former group MD Amitabh Jhunjhunwala : रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीचे माजी ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर अमिताभ झुनझुनवाला यांना अटक करण्यात आली आहे. कंपनीकडून स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) कथित कर्ज फसवणूक करून २,९२९.०५ कोटी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी सीबीआयने (CBI) सोमवारी कारवाई केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अमिताभ झुनझुनवाला हे अनिल अंबानी यांचे विश्वासू मानले जातात. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) सुरू असलेल्या एका तपासाच्या संदर्भात झुनझुनवाला हे आधीच तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होते. मुंबईतील एका विशेष न्यायालयाने प्रॉडक्शन वॉरंट जारी केल्यानंतर सीबीआयने त्यांना मुंबईत आणले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर सीबीआयने त्यांना रीतसर अटक केली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) तक्रारीनंतर रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड आणि अनिल अंबानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अमिताभ झुनझुनवाला हे रिलायन्स कम्युनिकेशन्स ग्रुपचे ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर होते आणि कॉर्पोरेट फायनान्स (संस्थात्मक वित्त), बँकिंग, निधीचा वापर इत्यादी विभागांच्या कामकाजावर त्यांचे नियंत्रण होते. कर्ज/अॅडव्हान्स मिळवण्यासाठी ते बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधायचे. त्यांच्या सूचनेनुसार, बँकांकडून मिळालेला कर्जाचा निधी रिलायन्स कम्युनिकेशन्स ग्रुपच्या इतर अधिकाऱ्यांकडून व्यवस्थापित आणि वापरला जात असे.

कर्जाच्या निधीचा गैरवापर झाल्यामुळे बँकांचे मोठे नुकसान झाले असा आरोप त्यांच्यावर आहे. विविध बँकांकडून कर्ज मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. कंपनीने ही रक्कम परत न केल्यामुळे ही खाती एनपीए (NPA – अनुत्पादक मालमत्ता) झाली आहेत. ते रिलायन्स कम्युनिकेशन्स ग्रुप कंपन्यांच्या प्रवर्तक (Promoters) आणि संचालकांकडून (Directors) सूचना घेत असत, असं एएनआने म्हटलं आहे.