पीटीआय, नवी दिल्ली : सरलेल्या डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द करावे लागलेल्या इंडिगोविरोधात भारतीय स्पर्धा आयोगाने गुरुवारी चौकशीचे आदेश दिले.

देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रासाठी धक्कादायी ठरलेल्या या घटनेसाठी कंपनीने अनुसरलेल्या कथित अनुचित व्यावसायिक पद्धतींच्या सखोल चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. तथापि आदेशाचे तपशीलवार पुनरावलोकन केल्यानंतर योग्य तो कायदेशीर मार्ग अवलंबला जाईल, असे कंपनीने ताबडतोब प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले आहे.

बाजारहिश्श्यानुसार भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने डिसेंबरच्या पहिल्या काही आठवड्यांत सुमारे ४,५०० उड्डाणे रद्द केली, ज्यामुळे देशभरातील हजारो प्रवासी अडकून पडले आणि अनेकांना प्रचंड त्रास सोसावा लागला. शिवाय जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रवासी विमान वाहतूक बाजारपेठेत मक्तेदार स्थितीबद्दलच्या चिंता व्यक्त केल्या गेल्या. या घटनेनंतर जवळपास दोन महिन्यांनी स्पर्धा आयोगाने बुधवारी इंडिगोविरुद्ध अनुचित व्यावसायिक पद्धतींसाठी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

विमान कंपन्यांशी संबंधित आणि विमान वाहतूक नियामक ‘डीजीसीए’ने दिलेल्या माहितीचा विचार केल्यानंतर, भारतीय स्पर्धा आयोगाने प्रथमदर्शनी असा निष्कर्ष काढला आहे की, इंडिगोने आपल्या बाजार-वर्चस्वी स्थितीचा गैरफायदा घेतला आहे. १६ पानांच्या आदेशात, आयोगाने म्हटले आहे की, नियोजित हजारो उड्डाणे रद्द करून, इंडिगोने प्रभावीपणे आपल्या सेवा रोखून ठेवल्या, ज्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आणि मागणीच्या काळात हवाई प्रवासासाठी ग्राहकांची उपलब्धता मर्यादित झाली.

विमान कंपनीच्या वर्तनामुळे भारतात स्पर्धेवर प्रथमदर्शनी लक्षणीय प्रतिकूल परिणाम होत असल्याचे नमूद करून, आयोगाने आपल्या महासंचालकांकडून ही सखोल चौकशी केली जावे असे आदेश दिले आहेत.

स्पर्धा आयोगाच्या चौकशीच्या आदेशाच्या परिणामी इंडिगोची पालक कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनचे शेअर्स गुरुवारी जवळपास १ टक्क्यांनी घसरणीसह बंद झाले. हे वृत्त आले तेव्हा दिवसाच्या व्यवहारात हा शेअर ३.६५ टक्क्यांनी घसरून ४,७८२.४५ रुपयांवर आला होता. त्यानंतर त्याने बहुतेक नुकसान भरून काढले आणि ०.६० टक्क्यांच्या घसरणीसह ४,९३३.९५ रुपयांवर तो बंद झाला.