CCPA fine Amazon Ram Mandir Prasad : तुम्ही जर ॲमेझॉन प्लॅटफॉर्मवरुन ‘अयोध्या श्री राम मंदिर प्रसाद’ मागवत असाल तर सावध व्हा. कारण, यात तुमच्या श्रद्धेसोबत, आर्थिक फसवणूकही होत आहे. या प्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ॲमेझॉनला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’वर ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरात श्री रामांचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. अशावेळी अनेकजण तिथून प्रसाद मिळेल या आशेने ई-कॉमर्स वेबसाईट्स चाळतात. भाविकांच्या श्रद्धेचा फायदा उलचत ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’कडून कोणतीही अधिकृत मान्यता न घेता ॲमेझॉनवर सामान्य मिठाईची विक्री ‘राम मंदिराचा प्रसाद’ म्हणून केली जात होती. यामुळे देशभरातील कोट्यवधी भाविकांची दिशाभूल होत असल्याचे सीसीपीएने स्पष्ट केले. या प्रकरणी मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांच्या पीठाने हा निर्णय दिला. ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने जानेवारी २०२४ मध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने काय म्हटलंय?
“श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या परवानगीशिवाय अशा प्रकारे व्यावसायिक फायद्यासाठी नावाचा वापर करणे हा केवळ ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत गैरप्रकार नाही, तर कोट्यवधी भाविकांच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रयत्न आहे,” असे प्राधिकरणाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
ॲमेझॉनचा युक्तिवाद फेटाळला
ॲमेझॉनने या प्रकरणात आम्ही फक्त प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देत असून आमची भूमिका मध्यस्थाची आहे, असा युक्तिवाद केला. यासाठी माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत ‘सेफ हार्बर’ संरक्षणाचा दावा केला होता. मात्र, अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचे सादरीकरण आणि विक्री सुलभ करण्यात ॲमेझॉनचा सहभाग असल्याचे सांगत सीसीपीएने हा दावा फेटाळून लावला.
कोणत्या पदार्थांची होत होती विक्री?
‘बिहार ब्रदर्स’ या ब्रँडअंतर्गत ‘चंदू ट्रेडिंग कंपनी’ ॲमेझॉनवर चार प्रकारच्या मिठाईंची विक्री करत होते. यामध्ये शुध्द तुपातील लाडू, खव्याचे लाडू, बुंदी लाडू, गाईच्या दुधाचे पेढे या उत्पादनांचा समावेश होता. हे सर्व प्रॉडक्ट अयोध्या श्री राम मंदिर प्रसाद म्हणून विकले जात होते.
