Central Government Employees DA Hike 2026 : सध्या केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे डोळे आठवड्या वेतन आयोगाकडे लागले आहे. मात्र, इतक्यात तरी नवीन वेतन आयोग लागू होण्याची चिन्हे दिसत नाही. अशावेळी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार लवकरच महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) मध्ये ३ टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. जुलै २०२६ च्या सुधारणा दरानुसार डीएमध्ये हा ३ टक्के वाढीचा प्रस्ताव असून, यामुळे सध्याचा डीए मूळ वेतनाच्या ६० टक्क्यांवरून थेट ६३ टक्क्यांवर पोहोचणार आहे.
हा नवीन बदल १ जुलै २०२६ पासून लागू मानला जाईल. मात्र, या निर्णयाला अद्याप मंत्रीमंडळाची अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. आज मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत हा प्रस्ताव अधिकृतपणे समाविष्ट केला जाईल का? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ का?
७ व्या वेतन आयोगाच्या नियमांनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए मधील वाढ ही औद्योगिक कामगारांच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI-IW) आधारित असते. जानेवारी ते जून २०२६ दरम्यानच्या CPI-IW च्या आकडेवारीनुसार, जुलै २०२६ पासून डीएचा दर जवळपास ६३ टक्के बनत आहे. जून २०२६ मध्ये हा आकडा १५१.९ नोंदवला गेला होता, ज्यामुळे जुलैच्या DA गणनेचे आवश्यक १२ महिन्यांचे चक्र पूर्ण झाले. सध्या जानेवारी २०२६ च्या संशोधनानंतर कर्मचाऱ्यांना ६० टक्के दराने डीए मिळत आहे. अशा परिस्थितीत ३ टक्के वाढ निश्चित मानली जात आहे.
तुमच्या पगारात किती होणार वाढ?
डीएची गणना ही मूळ वेतनावर केली जाते, हातात येणाऱ्या पगारावर नाही. जर तुमचा मूळ पगार ५०,००० रुपये असेल, तर तुमच्या पगाराच्या डीएमध्ये दरमहा १,५०० रुपयांची वाढ होईल. मात्र, इतर भत्ते आणि भविष्य निर्वाह निधी, टॅक्स यांसारख्या कपातीमुळे तुमच्या हातात येणाऱ्या प्रत्यक्ष पगारात थोडा फरक असू शकतो.
जुलै २०२६ पासून मिळणार एरियर?
सरकारने डीए वाढीची घोषणा कधीही केली तरी, तो १ जुलै २०२६ च्या प्रभावापासून लागू होणार आहे. जर प्रक्रियेत उशीर झाला आणि प्रत्यक्ष पेमेंट ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या पगारात जमा झाले, तर कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे थकीत पैसे (एरियर) एकरकमी दिले जाईल.
