Central Government Employees Diwali Bonus : दिवाळी आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या पगाराच्या बरोबरीचा उत्पादकता-विरहित बोनस देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीही केंद्रीय मंत्रिमंडळाने ७८ दिवसांच्या ‘प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस’ला मंजुरी दिली आहे. त्यामुळे यंदा सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

कोणाला आणि कसा मिळणार बोनस?

वित्त मंत्रालयाने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, गट ‘क’ मधील सर्व केंद्रीय कर्मचारी आणि गट ‘ब’ मधील सर्व अराजपत्रित कर्मचारी जे कोणत्याही प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस योजनेखाली येत नाहीत. यासोबत सशस्त्र दले आणि केंद्रीय निमसरकारी दलांमधील पात्र कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. केंद्रशासित प्रदेशांमधील कर्मचारी जे केंद्र सरकारच्या वेतनाचे नियम पाळतात, त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

पात्रतेच्या अटी व नियम

पात्र कर्मचारी ३१ मार्च २०२६ रोजी सेवेत असणे आवश्यक आहे तसेच त्यांनी वर्ष २०२५-२६ दरम्यान किमान ६ महिने सलग सेवा पूर्ण केलेली असावी. ६ महिने ते १ वर्षाच्या कालावधीसाठी सेवेच्या महिन्यांच्या आधारे प्रो-राटा तत्त्वावर रक्कम दिली जाईल. सेवा बजावत असताना ३१ मार्च २०२६ पूर्वी सेवानिवृत्त, वैद्यकीय कारणास्तव निवृत्त किंवा निधन झालेल्या कर्मचाऱ्यांनी जर त्या वर्षात किमान ६ महिन्यांची नियमित सेवा पूर्ण केली असेल, तर त्यांच्या वारसांना/त्यांना प्रो-राटा तत्त्वावर बोनस दिला जाईल.

बोनसची रक्कम आणि गणना

बोनसच्या गणनेसाठी मासिक वेतनाची कमाल मर्यादा ७,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ३० दिवसांसाठी उत्पादकता-विरहित बोनसची रक्कम ७००० रुपये x ३०/३०.४ = ६९०७.८९ रुपये इतकी होईल.

कंत्राटी व रोजंदारी कामगाऱ्यांना किती मिळणार?

५ दिवसांचा आठवडा असलेल्या कार्यालयांत ३ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ प्रतिवर्ष किमान २०६ दिवसकाम केलेले, किंवा ६ दिवसांचा आठवडा असलेल्या कार्यालयांत वर्षाला २४० दिवस काम केलेले रोजंदारी कामगार या बोनससाठी पात्र ठरतील. रोजंदारी कामगारांना १,१८४ रुपये बोनस मिळेल. जर वास्तविक मासिक वेतन १,२०० रुपयांपेक्षा कमी असेल, तर प्रत्यक्ष वेतनावर आधारित रक्कम दिली जाईल.

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा PLB बोनस मंजूर

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने २००९.६१ कोटी रुपयांच्या प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसला मंजुरी दिली आहे. यामध्ये पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला ७८ दिवसांसाठी कमाल १७,९५१ रुपये एवढा बोनस मिळेल.

कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा?

ट्रॅक मेंटेनर्स, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्तर, सुपरवायझर्स, तंत्रज्ञ, पॉईंट्समन आणि गट ‘क’ मधील इतर कर्मचाऱ्यांना हा बोनस दुर्गापूजा आणि दसऱ्याच्या सणापूर्वी दिला जाईल.