पीटीआय, नवी दिल्ली
सरलेल्या डिसेंबरअखेरीस म्हणजेच आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांत, केंद्राची वित्तीय तूट ही वार्षिक उद्दिष्टाच्या ५४.५ टक्क्यांवर पोहोचल्याचे शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.
सरकारचा खर्च आणि महसुली उत्पन्न यातील तफावतीला वित्तीय तूट म्हटले जाते. देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) कार्यालयाने वित्तीय तुटीची ही आकडेवारी शुक्रवारी जाहीर केली. त्यानुसार, तूट चालू आर्थिक वर्षात डिसेंबरअखेरीस ८.५५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षात (२०२४-२५) याच कालावधीत वित्तीय तूट वार्षिक उद्दिष्टाच्या ५६.७ टक्के पातळीवर होती.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत ४.४ टक्के मर्यादेत राखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तुटीचे उद्दिष्ट १५.६९ लाख कोटी रुपये सरकारने निर्धारित केले आहे.
सरकारला डिसेंबरअखेरपर्यंत २५.२५ लाख कोटी रुपयांचा कर महसूल मिळाला आहे. अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या तो ७२.२ टक्के आहे. गेल्या वर्षी डिसेंबरअखेरीस सरकारचा कर महसूल ४९.८ टक्के होता. तर डिसेंबरअखेरीस सरकारचा एकूण खर्च ३३.८ लाख कोटी रुपये होता. एकूण खर्चापैकी २५.९३ लाख कोटी रुपये हा महसुली खर्च असून, उर्वरित सुमारे ७.८७ लाख कोटी रुपये हा भांडवली खर्च आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने तुटीची स्थिती निर्माण झाली असून, डिसेंबरअखेरीस तुटीचे प्रमाण ८.५५ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

