Success Story highlights the growing trend of NRI professionals returning to India: परदेशातील भरघोस पगाराची नोकरी सोडणे हा एक कठीण निर्णय असतो. पण चेन्नईचे उद्योजक विवेक तिरुवेंगडम यांनी अमेरिकेतील १ कोटी रुपयांच्या वार्षिक पगाराची नोकरी सोडून, कुटुंबासह भारतात परतण्याचा आणि केवळ ९०,००० रुपयांच्या बचतीवर व्यवसायाची सुरुवात करण्याचा धाडशी निर्णय घेतला. आता सहा वर्षांनंतर क्युबिट फिटनेसचे संस्थापक आणि सीईओ असलेल्या विवेक यांना वाटते की, त्यावेळी त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच होता.
विवेक तिरुवेंगडम यांनी अलीकडेच एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपल्या व्यावसायिक प्रवासावर भाष्य केले आहे. यात त्यांनी सांगितले की, अमेरिकेत १४ वर्षे काम केल्यानंतर ते आपली पत्नी आणि ११ महिन्यांच्या मुलीसह चेन्नईला परतले. परदेशात अधिक पगाराची नोकरी करण्याऐवजी, त्यांनी कुटुंबाच्या जवळ राहणे आणि स्वतःचे काहीतरी निर्माण करणे पसंत केले.
“हा काही अचानक घेतलेला निर्णय नव्हता. मला माझ्या कुटुंबाच्या जवळ राहायचे होते. केवळ अधिक पैसे कमवणे हा उद्देश नव्हता, तर काहीतरी अर्थपूर्ण असे निर्माण करायचे होते”, असे त्यांनी लिहिले.
हा असा निर्णय घेणारे विवेक एकमेव आहे असे नाही, कारण गेल्या काही वर्षांत परदेशात मोठ्या पगारावर आणि मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या अनेक भारतीयांनी सर्व काही सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थलांतरविषयक तज्ज्ञांच्या मते, अलीकडच्या काळात परदेशात नोकरी-व्यवसायासाठी गेलेल्यांचे भारतत परतणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामागे भारतातील स्टार्टअप क्षेत्रातील उत्तम संधी, ‘रिमोट वर्क’ पद्धतीचा प्रसार, व्हिसाविषयक कठोर नियम आणि आपल्या कुटुंबाच्या जवळ राहण्याची वाढती इच्छा ही प्रमुख कारणे आहेत.
शून्यातून सुरुवात
जानेवारी २०२१ मध्ये, विवेक तिरुवेंगडम यांनी कोणतेही कार्यालय, गुंतवणूकदार किंवा टीम नसताना क्युबिट फिटनेस सुरू केले. केवळ एक लॅपटॉप, स्वतःचा वेळ आणि ९०,००० रुपयांची बचत यांच्या जोरावर त्यांनी हा व्यवसाय अगदी तळापासून उभा करण्यास सुरुवात केली.
पहिल्या वर्षात त्यांच्या जिद्दीची कसोटी लागली. पण, वर्षाच्या अखेरीस कंपनीने २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले होते, जे अमेरिकेत त्यांना मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत खूपच कमी होते. मात्र, याकडे अपयश किंवा अडथळा म्हणून पाहण्याऐवजी, या अनुभवामुळे आपण योग्य मार्गावर आहोत हा त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला, असे त्यांनी सांगितले.
“६ वर्षांपूर्वी, मी एक अशी झेप घेतली जी कागदावर पाहता अजिबात तर्कसंगत वाटत नव्हती, पण माझ्या मनाला ती पूर्णपणे योग्य वाटत होती. कधीकधी, तुमचा ‘विश्वास’ हीच तुमची एकमेव ‘व्यवसाय योजना’ असते”, असे त्यांनी पोस्टसोबत शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले.
गेल्या काही वर्षांत, क्युबिट फिटनेसने सातत्याने विस्तार केला, अधिक ग्राहक जोडले, आपली प्रणाली अधिक मजबूत केली आणि आपला प्रभाव वाढवला. हे पाऊल उचलल्यानंतर सहा वर्षांनी, विवेक थिरुवेंगडम म्हणाले की, त्यांनी एकेकाळी स्वतःसाठी निश्चित केलेला आर्थिक टप्पा अखेर गाठला आहे.
प्रतिभेपेक्षा सातत्य अधिक महत्त्वाचे
विवेक यांच्या मते एखाद्या क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर प्रतिभेपेक्षा सातत्य अधिक महत्त्वाचे आहे, संयमाचे फळ दीर्घकाळात मिळते आणि उद्देशपूर्ण कामातून पैसे कमावण्याचा अनुभव मुळातच वेगळा असतो. त्यांनी आपले कुटुंब, ग्राहक आणि हे सुरू करण्यास त्यांना प्रेरणा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आणि सांगितले की, कंपनी उभारण्यात त्यांच्या विश्वासाने आणि प्रोत्साहनाने महत्त्वाची भूमिका बजावली.
