Chirayu Rana Lorna Hajdini Case JP Morgan: जे.पी. मॉर्गन चेस बँकेचे माजी कर्मचारी चिरायू राणा यांनी ‘जॉन डो’ या टोपणनावाने बँकेच्या कार्यकारी संचालिका लोर्ना हाजदिनी यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा खटला दाखल केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर चिरायू राणा कोण आहेत, याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. तसेच राणा यांच्याबाबत त्यांच्या सहकार्यांनी केलेले भाष्यही समोर येत आहेत. राणा यांच्या एका सहकाऱ्याने ते ‘सामाजिक व्यवहारात काहीसा अवघडलेले’ (Socially awkward) असलs, तरीही बँकेच्या कामगिरीविषयक अपेक्षा पूर्ण करणारे कर्मचारी होते, असे सांगितले आहे.

राणा यांच्या सहकाऱ्यांनी काय सांगितले?

न्यू यॉर्क पोस्टच्या एका वृत्तानुसार, बँकेच्या अंतर्गत चौकशीदरम्यान बास्केटबॉलचे माजी खेळाडू आणि रटगर्स विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या चिरायू राणा यांच्या एका माजी सहकाऱ्याने त्याचे वर्णन “सामाजिक व्यवहारात काहीसे अवघडलेले” असे केले. मात्र त्याच वेळी, बँकेत आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या “सर्व निकषांची पूर्तता करणारा” कर्मचारी म्हणूनही त्यांनी राणांचे वर्णन केले.

या वृत्तात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, हाजदिनी आणि राणा हे ‘लिव्हरेज्ड फायनान्स’ टीममधील केवळ सहकारी होते. ही टीम मोठ्या कॉर्पोरेट अधिग्रहणे, विलीनीकरणे आणि खरेदी-विक्री व्यवहारांवर काम करते.

या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी ‘न्यू यॉर्क पोस्ट’ला सांगितले की, हाजदिनी या व्यवस्थापकीय संचालक ब्रँडन ग्राफेओ यांच्या हाताखाली काम करत असत, तर राणा यांच्या कामावर दुसरे व्यवस्थापकीय संचालक जॉन वॉल्टर यांचे नियंत्रण होते. यावरून हे स्पष्ट होते की, हाजदिनी यांच्याकडे राणांच्या बोनसच्या रकमेवर प्रभाव टाकण्याचा कोणताही अधिकार नव्हता.

त्यांची (हाजदिनी) प्रतिमा मलिन केली

“त्याने पूर्णपणे बनावट असलेल्या एका गोष्टीच्या आधारे त्यांची (हाजदिनी) प्रतिमा मलिन केली आहे”, असे राणा यांच्या आणखी एका सहकाऱ्याने ‘न्यू यॉर्क पोस्ट’ला सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०२५ मध्ये राणा यांनी एक अंतर्गत तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये त्यांनी वर्णद्वेषी आणि लिंग-आधारित छळ तसेच अधिकारांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, कंपनीतून बाहेर पडताना त्यांनी नुकसानभरपाई म्हणून लाखो रुपयांच्या रकमेची मागणी केली.

जेपी मॉर्गन प्रकरण नक्की काय आहे?

‘डेली मेल’च्या एका वृत्तानुसार, लोर्ना हाजदिनी यांचे माजी सहकारी चिरायू राणा यांनी असा दावा केला आहे की, त्यांना अनेक महिने वर्णद्वेषी भेदभाव आणि लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला. राणा यांनी एका खटल्याद्वारे असा दावा केला आहे की, हाजदिनी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे लैंगिक शोषण केले. हे थांबवण्याची राणा यांनी वारंवार विनंती करत असतानाही हाजदिनी यांनी ते सुरूच ठेवले.

जेपी मॉर्गनने आरोप फेटाळले

जे.पी. मॉर्गन चेस बँकेच्या प्रवक्त्याने ‘डो’ (चिरायू राणा) या व्यक्तीच्या ओळखीबाबत भाष्य करण्यास नकार दिला. तसेच, एचआर विभाग आणि अंतर्गत कायदेशीर विभागांनी केलेल्या सखोल अंतर्गत चौकशीत आरोपांना पुष्टी देणारा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.