बायोकॉनच्या संस्थापिका व अध्यक्षा किरण मुझुमदार-शॉ यांनी त्यांय्या उत्तराधिकारी म्हणून त्यांची पुतणी क्लेअर मुझुमदार यांच्या नावाची घोषणा केली आहे. पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली जाणार आहे.

कर्करोगावरील उपचारासाठी काम करणाऱ्या बिकारा थेरपेटिक्स या जैवतंत्रज्ञान कंपनीच्या क्लेअर या संस्थापिका व मुख्याधिकारी आहेत. या कंपनीला किरण मुझमुदार-शॉ यांनी पाठबळ दिले होते. ही कंपनी २०२४ मध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध झाली. बायोकॉनच्या नेतृत्वबदलाबाबत किरण मुझुमदार-शॉ यांनी स्पष्ट केले की, ‘मी तातडीने कंपनीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार नाही. माझी उत्तराधिकारी म्हणून क्लेअर ही टप्प्याटप्प्याने कंपनीची सूत्रे हाती घेईल. आमच्या कुटुंबाचा बायोकॉनमध्ये मोठा हिस्सा असून, कुटंबाचा वारसा दीर्घकाळ टिकावा, यासाठी पावले उचलण्यात येत आहे. कुटुंबातील सदस्य कंपनीच्या संचालक मंडळावरही आहेत.’

मुझुमदार-शॉ यांनी १९७८ मध्ये बायोकॉनची स्थापना केली. त्यांनी बेंगळुरूत एका गॅरेजमध्ये कंपनीची सुरूवात केली. कंपनीत त्यांचा २९.९२ टक्के हिस्सा आहे. सध्या ही जगातील आघाडीची बायोसिमिलर्स (जीवाणू, वनस्पती किंवा प्राण्यांच्या पेशींपासून तयार होणारी जैव औषधी) उत्पादक कंपनी असून, तिचे बाजार मूल्य ५८,५२१ कोटी रुपये आहे. बायोकॉनच्या महसुलापैकी बहुतांश हिस्सा हा अमेरिका आणि युरोपीय बाजारपेठेतून येतो. कंपनीचे तीसहून अधिक बायोसिमिलर्स असून, त्यातील १२ बायोसिमिलर्स व्यावसायिकदृष्ट्या बाजारात आले आहेत आणि इतर विकासाच्या प्रक्रियेत आहेत.