Mumbai CNG Price Hike : जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाचे चढे भाव यामुळे लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असल्याचे संकेत सरकारने दिले आहेत. मात्र, त्याआधीच मुंबई आणि परिसरातील सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसणार आहे. महानगरात सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने प्रति किलो २ रुपयांची दरवाढ केल्यामुळे मुंबईतील सीएनजीचा नवा दर आता ८४ रुपये झाला आहे.
मुंबईकरांना दरवाढीची झळ
महानगर गॅसने सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ केली असून, नवी दिल्लीतील वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही किमती कडाडल्या आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि संपूर्ण एमएमआर क्षेत्रात आज, १४ मे पासून हे नवे दर लागू झाले आहेत. यापूर्वी मुंबईत सीएनजीचा दर ८२ रुपये प्रति किलो होता, जो आता ८४ रुपयांवर पोहोचला आहे.
सीएनजी दरवाढीची प्रमुख कारणे
इराण-इस्रायल युद्ध आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाल्यामुळे नैसर्गिक वायूची आयात महागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने वायू खरेदीचा खर्च वाढला आहे. देशांतर्गत वायूची उपलब्धता मर्यादित असल्याने कंपन्यांना महागडा विदेशी गॅस अधिक प्रमाणात खरेदी करावा लागत आहे.
रिक्षा-टॅक्सी महागणार?
मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुमारे १२.८ लाख वाहने सीएनजीवर धावतात. यामध्ये ४.७० लाख रिक्षा, १.६० लाख टॅक्सी आणि ५ लाखांहून अधिक खासगी कारचा समावेश आहे. या दरवाढीनंतर ऑटो आणि टॅक्सी युनियनने भाडेवाढीची मागणी लावून धरली आहे. युनियन नेत्यांच्या मते, या वाढीमुळे रिक्षा चालवण्याचा खर्च प्रति किलोमीटर १.०३ रुपयांनी वाढणार आहे. परिणामी, रिक्षा-टॅक्सीच्या मूळ भाड्यात किमान १ रुपयाची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पेट्रोल-डिझेलचीही झळ लवकरच बसणार
इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता करार बारगळल्याने कच्च्या तेलाचे भाव पुन्हा कडाडले आहेत. परिणामी अमेरिकन डॉलर मजबुत झाल्याने भारतीय चलन रुपयावर दबाव वाढत आहे. भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के कच्चे तेल आयात करतो. अशात तेल कंपन्यांना डिझेलमागे प्रति लीटर ८० तर पेट्रोलसाठी २० रुपये तोटा सहन करावा लागत आहे. सध्या सरकारने इंधनावरील कर घटवला असलातरी हे फार काळ टीकणार नाही. त्यामुळे आगामी काळात इंधन दरवाढ उटळ असल्याचे संकेत सरकारने दिले आहेत.
