Coal Gasification Scheme India : गरज ही शोधाची जननी आहे, अशी प्रसिद्ध म्हण आहे. इराण-अमेरिका युद्ध पेटल्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात इधन आणि गॅस टंचाई निर्माण झाली होती. भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के उर्जेची आयात करतो. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने कोळशापासून गॅस निर्मिती योजनेची घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या ३७,५०० कोटी रुपयांच्या कोळसा गॅसिफिकेशन’ योजनेच्या पहिल्या टप्प्याला उद्योगांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज करणाऱ्यांमध्ये अदानी एंटरप्रायझेस आणि एनटीपीसी यांसारख्या बलाढ्य कंपन्यांचा समावेश आहे.
अर्जदार कंपन्या आणि प्रस्तावित प्रकल्प
या योजनेअंतर्गत देशांतर्गत कोळश्याचे रूपांतर युरिया, सिंथेटिक नॅचरल गॅस आणि सिंथेटिक गॅस यांसारख्या उच्च-मूल्य उत्पादनांमध्ये केले जाणार आहे. अदानी समूहाने युरिया (रासायनिक खत) निर्मितीला लक्ष्य करत ३ स्वतंत्र प्रकल्प प्रस्ताव दाखल केले आहेत. एनटीपीसी (NTPC) या सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज कंपनीने ‘सिंथेटिक नॅचरल गॅस’ (SNG) निर्मितीसाठी अर्ज केला आहे. तालचेर फर्टिलायझर्स या कंपनीने युरिया निर्मिती प्रकल्पासाठी प्रस्ताव दिला आहे. गॅलंट इस्पातने डायरेक्ट रिड्यूस्ड आयर्न (DRI) आणि सिनगॅस निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे, तर श्याम सेल अँड पॉवर या कंपनीने सिंथेसिस गॅस (Syngas) उत्पादनासाठी अर्ज सादर केला आहे.
२.७७ लाख कोटींची आयात बचत
कोळसा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताने या चार घटकांच्या आयातीवर सुमारे २.७७ लाख कोटी रुपये खर्च केले होते. देशांतर्गत कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञानामुळे या प्रचंड परदेशी चलनाची बचत होण्यास मदत होणार आहे.
२०३० पर्यंत १० कोटी टनांचे लक्ष्य
केंद्र सरकारने २०३० पर्यंत १० कोटी टन कोळसा गॅसिफिकेशन क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी ७.५ कोटी टन क्षमता या नवीन योजनेअंतर्गत विकसित केली जाईल. या उपक्रमामुळे देशात सुमारे २.५ ते ३ लाख कोटींची नवीन गुंतवणूक आणि संपूर्ण पुरवठा साखळीत मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होईल असा अंदाज आहे. यापूर्वी कार्यन्वित असलेल्या जानेवारी २०२४ च्या ८,५०० कोटींच्या पहिल्या प्रोत्साहन योजनेअंतर्गत आधीच ८ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
गॅसिफिकेशन म्हणजे काय?
या प्रक्रियेत कोळसा, बायोमास किंवा कचरा यांसारख्या कार्बनयुक्त पदार्थांचे उच्च तापमानावर (७०० डिग्री से. पेक्षा जास्त) ऑक्सिजन आणि वाफेच्या नियंत्रित प्रमाणात सिंथेटिक वायूमध्ये रूपांतर केले जाते. या अभिक्रियेतून मिळणाऱ्या वायूच्या मिश्रणाला सिंथेसिस गॅस (Syngas) म्हणतात, ज्यामध्ये प्रामुख्याने कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोजन हे वायू असतात.
