Cognizant Layoffs : गेल्याच महिन्यात आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘इन्फोसिस’ने यापुढे नोकरकपात नाही तर भरती करणार असल्याची घोषणा केली होती. ही बातमी ताजी असतानाच तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. आयटी कंपनी ‘कॉग्निझंट’मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीचे वारे वाहत आहे. जगभरातील सुमारे १२,००० ते १५,००० कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या कपातीचा सर्वाधिक फटका भारतातील कर्मचाऱ्यांना बसण्याची चिन्हे आहेत.
कॉग्निझंटने आपल्या ‘प्रोजेक्ट लीप’ या नवीन उपक्रमांतर्गत सुमारे २३ कोटी ते ३२ कोटी डॉलर्स इतका निधी कर्मचाऱ्यांच्या सेवेतून मुक्त करण्याच्या खर्चासाठी राखून ठेवला आहे. कंपनीने अद्याप अधिकृतपणे कर्मचाऱ्यांच्या संख्येचा खुलासा केला नसला तरी, उद्योगातील सूत्रांच्या प्राथमिक अंदाजानुसार ही कपात १२,००० ते १५,००० च्या घरात जाण्याची शक्यता आहे, असा अहवाल ‘मनीकंट्रोल’ या वेबसाईटने दिला आहे.
भारतावर सर्वाधिक परिणाम का?
कॉग्निझंटच्या एकूण ३,५७,००० कर्मचाऱ्यांपैकी २,५०,००० हून अधिक कर्मचारी एकट्या भारतात कार्यरत आहेत. भारतातील सरासरी पगार आणि कपातीसाठी द्यावा लागणारा सहा महिन्यांचा पगार लक्षात घेता, केवळ भारतातूनच १२,००० ते १३,००० कर्मचाऱ्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, असा अंदाज आहे. अमेरिकेसारख्या देशांमध्ये पगार आणि सेवेतून मुक्त करण्याचा खर्च अधिक असल्याने तिथे कमी कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल.
एआय आणि मनुष्यबळाचा समन्वय साधणार
कंपनीचे सीईओ रवी कुमार एस. यांनी दिलेल्या संकेतांनुसार, कंपनी आता “ब्रॉड आणि शॉर्ट पिरॅमिड” मॉडेलकडे वळत आहे. यामध्ये ‘डिजिटल लेबर’ आणि ‘ह्युमन लेबर’ यांचा समन्वय साधला जाणार आहे. ग्राहक आता पारंपारिक मनुष्यबळावर आधारित मॉडेलसाठी निधी देण्यास उत्सुक नसून फ्रेशर्सच्या प्रशिक्षणाचा खर्च उचलण्यास नकार देत आहेत.
आयटी क्षेत्रातील कपातीचे सत्र
केवळ कॉग्निझंटच नाही, तर संपूर्ण आयटी क्षेत्र सध्या मंदावलेली मागणी आणि ऑटोमेशनमुळे पुनर्रचना करत आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने जुलै २०२५ मध्ये १२,५०० कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे संकेत दिले होते. याव्यतिरिक्त ॲक्सेंचर, एचसीएलटेक आणि ओरॅकल या कंपन्यांनीही गेल्या वर्षभरात मोठी कर्मचारी कपात केली आहे. कॉग्निझंटने यापूर्वी २०२३-२४ मध्ये ‘NextGen’ कार्यक्रमांतर्गत सुमारे ३,५०० नोकऱ्या कमी केल्या होत्या.
तरुणांना अद्ययावत होणे काळाजी गरज
आयटी कंपन्या आता वेगाने एआय आणि ऑटोमेशनकडे वळत आहेत. यामुळे पूर्वीच्या कोडिंग आणि मेंटेनन्सच्या नोकऱ्यांवर येणारा दबाव येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांनी आपली कौशल्ये वेळेनुसार अद्ययावत करणे आता काळाची गरज बनली आहे.
