Commercial LPG prices : पेट्रोल-डिझलेच्या दरवाढीनंतर आता एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. आजपासून (१ जून २०२६) देशभरातील व्यावसायिक आणि छोट्या व्यापाऱ्यांना आणखी एक मोठा आर्थिक फटका बसला आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. या नव्या दरवाढीमुळे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, केटरर्स आणि हजारो लहान व्यावसायिकांचे बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांना बाहेर जेवणासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. सुदैवाने, घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
काय आहेत नवीन दर?
या ताज्या दरवाढीनंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत ४२ रुपयांची वाढ झाली असून, तो आता ३,११३.५० रुपयांना मिळणार आहे. तर कोलकात्यात सर्वाधिक म्हणजेच ५३.५० रुपयांची वाढ झाल्याने तिथला दर ३,२५५.५० रुपयांवर पोहोचला आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील १ जून २०२६ चे सुधारित दर
| शहर | १९ किलो व्यावसायिक सिलेंडरची नवी किंमत |
| मुंबई | ३,०२४.५० |
| दिल्ली | ३,११३.५० |
| पाटणा | ३,३२२.०० |
| हैदराबाद | ३,२९४.०० |
| कोलकाता | ३,२५५.५० |
| चेन्नई | ३,२३२.०० |
केवळ मोठे सिलेंडरच नव्हे, तर ५ किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही ११ रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत आता हा छोटा सिलेंडर ८२१.५० ला मिळेल. याचा फटका विद्यार्थी आणि बाहेर राहणाऱ्या नोकरदारवर्गाला बसणार आहे.
अवघ्या ५ महिन्यांत किमती दुप्पट!
चालू वर्षाच्या सुरुवातीचा विचार केला, तर व्यावसायिक गॅसच्या किमतीने व्यावसायिक आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जानेवारीमध्ये दिल्लीत ज्या सिलेंडरची किंमत १,६९१.५० रुपये होती, ती अवघ्या पाच महिन्यांत तब्बल १४०० रुपयांपेक्षा जास्त वाढली आहे.
पेट्रोल-डिझेल’ही महागले
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कडाडल्याने तेल कंपन्यांनी त्याचा भार ग्राहकांवर टाकला आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल ७.३५ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ७.५३ रुपये प्रति लीटर महाग झाले आहे. दरम्यान, कच्चे तेल पुन्हा एकदा १०० डॉलर प्रति बॅरलच्या पार झाल्याने याचा परिणाम इंधन दरवाढीवर होणार असल्याचे स्पष्ट आहे. तज्ज्ञांच्या मते पेट्रोल-डिझेलच्या किमती १७ ते २० रुपयांपर्यंत टप्याटप्याने वाढू शकतात.
गॅस संकट का ओढवले?
भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के एलपीजी मध्यपूर्वेतील देशांमधून आयात करतो. याचा बहुतांश पुरवठा हा ‘होर्मुझ’च्या सागरी मार्गातून होतो. मात्र, इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यात संघर्षाची ठिणगी पडल्याने येथून होणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. युद्धापूर्वी ज्या सागरी मार्गातून दररोज १०० च्या आसपास जहाजे जात होती, ती संख्या आता केवळ ३ ते ५ इतकी कमी झाली आहे. ज्याचा थेट फटका भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांना बसला आहे. भारताने कच्च्या तेलासाठी पर्यायी मार्ग शोधले असले, तरी एलपीजीचा पुरवठा अद्यापही दबावाखाली आहे. घरगुती ग्राहकांना महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारने व्यावसायिक सिलेंडरवर हा बोजा टाकल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
