Prices of commercial LPG gas cylinder : आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. आजच्या अर्थसंकल्पातून सामान्यांना काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच सामान्यांच्या खिशाला भुर्दंड पडणारी एक बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ४९ रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ आज, १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मुंबई- दिल्लीत दर काय?

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झालेली वाढ हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यावसायांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱअया १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवर लागू होते. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ किंमत आता १ हजार ७४० रुपये झाली आहे. तर मुंबईत १६९२ रुपये किंमत झाली आहे. जागतिक इंधन ट्रेंड आणि घरगुती खर्च घटकांवर आधारित ओएमसींनी केलेल्या मासिक किंमत समायोजनाचा भाग म्हणून ही सुधारणा करण्यात आली आहे.

घरगुती सिलिंडर दर कायम

या वाढीचा परिणाम हॉटेलिंग क्षेत्रावर अधिक होणार आहे. कारण इथेच व्यावसायिक सिलिंडर महत्त्वाचा घटक असतो. दरम्यान, घरगुती ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत बदललेली नाही. १ फेब्रुवारीपासून घरगुती एलपीजीच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

तुमच्या शहरांत सिलिंडरचा दर किती?

शहरकिंमत (Rs)
दिल्ली१७४०.५०
कोलकत्ता१८४४.५०
मुंबई१६९२
चेन्नई१८९९.५०
फरिदाबाद१७४२.५०
शिमला१८३४.५०
थिरुअनंतपुरम१७६८
जयपूर१७६९
लुधियाना१८२३
कत्तक१८९५

एलपीजीच्या किंमतींचा दर महिन्याच्या सुरुवातीला आढावा घेतला जातो आणि त्यात बदल आंतरराष्ट्रीय ऊर्जेच्या किमती, चलनाच्या हालचाली आणि लॉजिस्टिक्स खर्चावर अवलंबून असतात.

आज अर्थसंकल्प अधिवेशन

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या चालू कार्यकाळातील एक महत्त्वाचा अर्थसंकल्प मानला जातो. अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. आज भारतीय शेअर बाजारात नेहमीप्रमाणे व्यवहार चालू राहतील. अर्थसंकल्पामुळे, राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी खुले राहतील.