Tata Trusts Dispute : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहात सुरू झालेला अंतर्गत वाद संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता समूहातील अत्यंत प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या ‘टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट’मध्ये विश्वस्तांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला आहे. वेणु श्रीनिवासन आणि विजय सिंह यांचा कार्यकाळ येत्या रविवारी संपत असल्याने फेरनियुक्तीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. याविरोधात मेहली मिस्त्री आणि जे. एन. मिस्त्री यांनी मतदान केले आहे. ट्रस्टच्या नियमानुसार, कोणत्याही विश्वस्ताचा कार्यकाळ वाढवण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांची ‘सर्वसंमती’ असणे अनिवार्य आहे. दोन सदस्यांनी उघड विरोध केल्यामुळे आता श्रीनिवासन आणि सिंह यांची फेरनियुक्ती तांत्रिकदृष्ट्या अशक्य मानली जात आहे.
श्रीनिवासन यांच्या उपाध्यक्षपदावर टांगती तलवार?
वेणु श्रीनिवासन हे सध्या टाटा ट्रस्ट्सचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मात्र, जर ते TEDT सारख्या महत्त्वाच्या ट्रस्टचे विश्वस्त म्हणून कायम राहू शकले नाहीत, तर त्यांच्या टाटा ट्रस्ट्समधील उपाध्यक्षपदावरही कायदेशीर आणि तांत्रिक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. टीईडीटी टाटा सन्समध्ये भागीदार नसली तरी ५,००० कोटी रुपयांहून अधिक निधी असलेल्या या ट्रस्टचा प्रभाव टाटा नेटवर्कमध्ये मोठा आहे. देशातील शैक्षणिक क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे.
८ मे च्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
या वादाच्या पार्श्वभूमीवर, येत्या ८ मे रोजी टाटा ट्रस्ट्सची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत टाटा सन्सच्या बोर्डावरील ट्रस्टच्या प्रतिनिधींच्या नियुक्तीचा आढावा घेतला जाणार आहे. टाटा सन्सचे आजीवन विश्वस्त नोएल टाटा यांनी अद्याप या विषयावर आपले मत व्यक्त केलेले नाही, त्यामुळे या संपूर्ण वादात त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
भास्कर भट्ट यांच्या एन्ट्रीची चर्चा
तज्ज्ञांच्या मते, विश्वस्त मंडळातील हे मतभेद केवळ एका ट्रस्टपुरते मर्यादित नाही. तर टाटा सन्सच्या बोर्डावरील प्रतिनिधी बदलण्याच्या हालचाली असू शकतात. याचाच एक भाग म्हणून भास्कर भट्ट यांना टाटा सन्सच्या बोर्डात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. मनीकंट्रोलच्या एका अहवालानुसार, टाटा ट्रस्ट्स सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त भास्कर भट्ट यांना टाटा सन्सच्या संचालक मंडळावर नामनिर्देशित करण्याचा विचार करू शकते. सध्या ट्रस्टचे उपाध्यक्ष असलेले वेणू श्रीनिवासन यांना नामनिर्देशित संचालक पदावरून हटवले जाऊ शकते. श्रीनिवासन आणि सिंह यांच्या नियुक्तीला झालेला विरोध हा टाटा समूहातील भविष्यातील मोठ्या प्रशासकीय बदलांची सुरुवात मानली जात आहे.
