– ओंकार अरुण भिडे
देशाची अर्थव्यवस्था जगासाठी खुली करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन आता पस्तीस वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. १९९१ च्या आर्थिक उदारीकरणाने भारतीय अर्थव्यवस्थेचेच नव्हे, तर वाहन उद्योगाचेही संपूर्ण चित्र बदलून टाकले. एकेकाळी मारुती, हिंदुस्तान मोटर्स आणि प्रीमियर या मोजक्या कंपन्यांपुरती मर्यादित असलेली भारतीय कार बाजारपेठ आज जागतिक ऑटोमोबाईल उद्योगाचा महत्त्वाचा भाग बनली आहे.
१९९१ मध्ये जगाच्या पहिल्या दहा कार बाजारपेठेत पण नसणारी भारतातील कार बाजारपेठ अवघी काही लाख युनिट्सची होती. मात्र, आर्थिक सुधारणांमुळे परदेशी गुंतवणूक वाढली, रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, मध्यमवर्ग विस्तारला आणि सर्वसामान्यांची क्रयशक्ती लक्षणीयरीत्या वाढली. परिणामी, २०२५ पर्यंत भारतातील कार बाजारपेठ आतापर्यंत खूप वेगाने वाढली असून, जगातील तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ बनली आहे. आज देशात दहापेक्षा अधिक कार उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत, तर दुचाकी वाहनांची बाजारपेठ जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.
‘अल्टो 800’पासून ‘रोल्स रॉयस’पर्यंतचा प्रवास
आज एखाद्या ग्राहकाने कार खरेदीचा विचार केला, तर त्याच्यासमोर अल्टो ८०० या एंट्री-लेव्हल कारपासून ते रोल्स रॉयससारख्या अल्ट्रा-लक्झरी कारपर्यंत पर्याय उपलब्ध आहेत. केवळ पर्यायच नव्हे, तर कार खरेदी करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. एक्स-शोरूम किमतीच्या ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत कर्ज सहज मिळते. एकदा चौकशी केली की डीलरकडील विक्री प्रतिनिधी ग्राहकाच्या मागे लागतो, तोपर्यंत की गाडी खरेदी होईपर्यंत.
स्पर्धा इतकी तीव्र झाली आहे की, एकाच कंपनीच्या दोन डीलरांमध्येही छुपी चढाओढ असते. ‘या अॅक्सेसरी मोफत देतो’, ‘इन्शुरन्समध्ये सवलत देतो’, ‘फिटमेंट करून देतो’ अशा ऑफर्समुळे ग्राहकाच्या हातात सौदेबाजीची ताकद आली आहे. परिणामी, उत्पादनाची गुणवत्ता, सेवा आणि विक्रीनंतरचा अनुभव यावर कंपन्यांना अधिक भर द्यावा लागत आहे. ग्राहक खरोखरच आता ‘राजा’ होऊ लागला आहे; मात्र, तो अजून पूर्णपणे राजा झाला आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
भारतीय कार उद्योग : संक्रमणावस्थेतील वास्तव
भारतीय कार उद्योग सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. अनेक मूलभूत बदल झाले असले, तरी जागतिक दर्जाच्या तुलनेत आपण नेमके कुठे आहोत, याची जाणीव अनेक ग्राहकांना अजूनही नाही. गेल्या दीड-दोन वर्षांतच आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही सुरक्षा वैशिष्ट्ये भारतात अनिवार्य होत आहेत. कंपन्या कारच्या ‘सेगमेंट’च्या नावांवर भर देऊन विपणन करतात; मात्र, प्रत्यक्षात त्या सेगमेंटचा अर्थ, वैशिष्ट्ये आणि मर्यादा समजून घेणे ग्राहकांसाठी आवश्यक आहे.
एंट्री लेव्हल-हॅचबॅक कार
साधारणतः ३७०० मिमी लांबी, १६०० मिमी रुंदी आणि १५५० मिमी उंची असलेल्या कार या एंट्री लेव्हल हॅचबॅक श्रेणीत मोडतात. या कारमध्ये किमान १००० सीसी क्षमतेचे इंजिन असते. प्रवाशांना प्राधान्य दिल्यामुळे कार्गो (डिक्की) जागा मर्यादित असते. मात्र, मागील सीट फोल्ड करून अतिरिक्त जागा निर्माण करता येते. या कारमध्ये चार प्रवासी आरामात बसू शकतात. आजच्या घडीला या सेगमेंटमध्येही एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी यांसारखी मूलभूत सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात येत आहेत. त्यासोबतच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक ओआरव्हीएम, स्टिअरिंग-माउंटेड कंट्रोल्स, इलेक्ट्रिक पॉवर स्टिअरिंग यांसारखी फीचर्सही उपलब्ध आहेत.
उदा. टियागो, वॅगनआर, सेलेरियो
मिड हॅचबॅक कार
सुमारे ३७९५ मिमी लांबी, १६९५ मिमी रुंदी, १५५० मिमी उंची आणि २४७० मिमी व्हीलबेस असलेल्या कार मिड हॅचबॅक सेगमेंटमध्ये येतात. या कारमध्ये 1200 सीसी क्षमतेचे किंवा टर्बो इंजिन असते. आकार थोडा मोठा असल्याने प्रवाशांसाठी अधिक आरामदायी जागा उपलब्ध होते. या सेगमेंटमध्ये ग्राहकांची मागणी झपाट्याने वाढल्यामुळे पर्यायांची संख्या मोठी आहे. सुरक्षा आणि आरामदायी फीचर्स या कारमध्ये जवळपास स्टँडर्ड झाले आहेत.
उदा. मारुती स्विफ्ट, ग्रँड आय १० निऑस
प्रीमियम हॅचबॅक कार
भारतीय बाजारपेठेत तुलनेने नवी असलेली ही श्रेणी वाढत्या उत्पन्न आणि बदलत्या जीवनशैलीचे प्रतीक आहे. सुमारे ३९९५ मिमी लांबी, २५२० मिमी व्हीलबेस आणि १५०० मिमी उंची असलेल्या या कारमध्ये साधारण १५०० सीसी इंजिन असते. या कारमध्ये केवळ जागाच नव्हे, तर प्रीमियम अनुभव देणारी इंटीरियर क्वालिटी, प्रगत सुरक्षा फीचर्स, रिअर कॅमेरा, पार्किंग सेन्सर्स आदी सुविधा असतात.
उदा. आय20, बलेनो, अल्ट्रॉझ
अल्ट्रा प्रीमियम हॅचबॅक
या सेगमेंटमध्ये प्रामुख्याने मर्सिडिज बेंझ आणि बीएमडब्लू या कंपन्यांच्या कार येतात. यात लक्झरी कारची सर्व फीचर्स असली तरी त्यांचे डिझाइन हॅचबॅकसारख. पण, त्यात प्रीमियमपणा दिसण्याच्या दृष्टीने अत्यंत बारकाईने विचार केलेला आहे. प्रामुख्याने घरातील सेकंड कार आणि छोट्या राइडसाठी वापरायची म्हणजेच अर्बन राइड सेंट्रिक पोझिशनिंग असणारी. मर्सिडिझ बेंझ ए क्लास पूर्वी यात होती. बीएमडब्लूची मिनी सध्या बाजारपेठेत उपलब्ध असणारी कार असून, सब फोरमीटर कार आहे.
(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक व मुक्त पत्रकार आहेत.)

