Crude Oil Price Rise Marathi : पश्चिम आशियातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. जागतिक उर्जेपैकी २० टक्के पुरवठा होणाऱ्या होर्मुझ सागरी मार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका इरेला पेटला आहे. अशात सौदी अरेबियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर हुथी बंडखोरांनी हल्ला केला आहे. या सर्वांचा परिपाक म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत भडका उडला आहे. बुधवारी २ महिन्यानंतर पुन्हा एकदा ब्रेंट क्रूडचे भाव १०० डॉलर पार गेले आहेत. या भाववाढीमुळे भारतासह आशियाई देशांमध्ये महागाईचा भडका उडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
खारक बेटाजवळ अमेरिकेचा थेट हल्ला
- पश्चिम आशियातील संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. इराणच्या अत्यंत महत्त्वाच्या खारक बेटाजवळील तेलाची वाहतूक करणाऱ्या ५ इराणी टँकर्सवर अमेरिकेच्या सैन्याने हवाई आणि सागरी हल्ले करून ते नष्ट केले. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळाला आणि जहाजांना लक्ष्य केले.
- त्याचवेळी, यमनमधील इराणी समर्थित हूती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या शहरांवर आणि ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्याने सौदीमधील तेल निर्मितीला मोठा धक्का बसला आहे. जगात इंधनाचा सर्वात महत्त्वाचा मार्ग मानल्या जाणाऱ्या ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ पूर्णपणे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे.
तेलाचे भाव २५ टक्क्यांनी वधारले
ऑगस्टच्या सुरुवातीला इराण आणि अमेरिकेतील शांततेच्या आशा मावळल्याने असून युद्ध आणखी उग्र होत चालले आहे. परिणामी ब्रेंट क्रूडच्या भावात तब्बल २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. या चालू वर्षात तेलाचे भाव एकूण ६० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.
महागाई अन् व्याजदरांवर सावट
फिलिप नोव्हाच्या मार्केट इनसाइट्स प्रमुख प्रियंका सचदेवा यांच्या मते, “कच्च्या तेलाचे १०० डॉलरवर पोहोचणे हा केवळ एक आकडा किंवा मानसिक पातळी नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे.” त्याचप्रमाणे ओसीबीसी बँकेच्या विश्लेषकांनी सांगितले की, “इराणने सौदीच्या ऊर्जा प्रकल्पांवर केलेले हल्ले आणि टँकर्सच्या नासधुशीमुळे इंधनाचा पुरवठा दीर्घकाळ खंडित राहण्याची दाट शक्यता आहे.”
भारतावर काय परिणाम होणार?
भारत आपल्या गरजेच्या तब्बल ८५% कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे ब्रेंट क्रूड १०० डॉलर पार गेल्याने देशात पेट्रोल-डिझेल, वाहतूक खर्च आणि दैनंदिन वस्तूंचे भाव वाढू शकतात. महागाई वाढल्याने भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदरांमध्ये कपात टाळू शकते, तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक कमकुवत होण्याचा धोका आहे.
