वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
पश्चिम आशियातील युद्धाची तीव्रता वाढल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमतीचा बुधवारी भडका उडाला. खनिज तेलाच्या किमती सहा आठवड्यानंतर प्रथमच प्रतिपिंप १०० डॉलरवर पोहोचल्या. यामुळे आगामी काळात तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या भारतासह इतर देशांमध्ये महागाईत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अमेरिका आणि इराणमधील युद्ध आणखी पेटल्याने आधीच कमकुवत झालेली तेलाची पुरवठा साखळी धोक्यात आली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमती बुधवारी प्रतिपिंप १०० डॉलरपार गेल्या. बाजार बंद होताना त्या प्रतिपिंप ९७.८९ डॉलरवर स्थिरावल्या. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याची चिन्हे संपुष्टात आल्याने ऑगस्टपासून खनिज तेलाच्या किमतीत एक तृतीयांश वाढ नोंदविण्यात आली आहे. या वर्षभरात खनिज तेलाच्या किमतीत ६० टक्के वाढ झाली आहे.
खनिज तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल, डिझेलसह विमान इंधनाच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे आगामी काळात प्रवासासह मालवाहतूक महागणार आहे. खनिज तेलाच्या भडक्याने एकूणच महागाईत वाढ होण्याची चिन्हे आहे. कारण आशियातील भारतासह अनेक अर्थव्यवस्था या प्रामुख्याने आयात खनिज तेलावर अवलंबून आहेत. खनिज तेलाची किंमत प्रतिपिंप १०० डॉलरवर जाणे हा या अर्थव्यवस्थांसाठी धोक्याचा इशारा आहे, अशी माहिती विश्लेषकांनी दिली.
तेलवाहतुकीवर परिणाम
पश्चिम आशियातील संघर्ष आणखी वाढला असून, तेल उत्पादन प्रकल्पांसह तेलवाहू जहाजांवर हल्ले सुरू आहेत. अमेरिकी नौदलाच्या युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न इराणने केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणच्या पाच तेलवाहू जहाजांना लक्ष्य केले आहे. तसेच, हूथी बंडखोरांनी सौदी अरेबियातील तेल उत्पादन प्रकल्पांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. यामुळे तेल उत्पादन प्रकल्पांच्या ठिकाणी आगी लागल्या आहेत. या संघर्षामुळे होर्मूझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलवाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.
