Crude Oil Price : मध्यपूर्वेत संघर्षाची ठिणगी पेटल्यापासून भारतीय गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे. गेल्या महिन्याभरात शेअर बाजार प्रचंड अस्थिर झाला असून गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेलाच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या कराराबाबत “चांगली प्रगती” होत असल्याचे संकेत दिल्याने जागतिक बाजारातील तणाव निवळला असून तेलाच्या किमतींवरील दबाव कमी झाला आहे.
ब्रेंट क्रूड आणि WTI च्या किमतीत मोठी घट
मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे ४ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवण्यात आली. या घसरणीनंतर ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे १०८ डॉलरच्या स्तरावर पोहोचली आहे. तसेच, अमेरिकन बाजारपेठेतील महत्त्वाचे मानले जाणारे वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट देखील प्रति बॅरल १०० डॉलरच्या आसपास आले आहे. काही दिवसांच्या सातत्यपूर्ण तेजीनंतर आता किमतीत नरमाई दिसून येत आहे.
मध्य-पूर्वेतील तणाव आणि पुरवठा साखळी
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मध्य-पूर्वेत सुरू झालेल्या वादाचा जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. यामुळे जागतिक बाजारात तेलाची कमतरता निर्माण होऊन किमतीत तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. विशेषतः ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ या समुद्री मार्गावरील अडथळ्यांमुळे पुरवठा साखळीच विस्कळीत झाली आहे.
सद्यस्थिती काय?
‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ येथे सध्या दुहेरी दबाव आहे. इराणकडून जहाजांच्या वाहतुकीत अडथळे आणले जात असताना, दुसरीकडे अमेरिकेनेही काही जहाजांना रोखून धरले आहे. यामुळे हजारो जहाजे अडकून पडली असून जागतिक पुरवठा साखळी खंडीत झाली आहे. ज्या मार्गातून दररोज १०० पेक्षा जास्त जहाजे प्रवास करत होती, ती संख्या आता १ ते ४ अशी झाली आहे. सध्या सक्रिय युद्धासारखी परिस्थिती नसल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, अधूनमधून एकमेकांवर हल्ले करण्याचे पूर्णपणे थांबलेले नाही.
अमेरिकन साठ्यात घट आणि भविष्यातील कल
अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या साठ्यात गेल्या आठवड्यात सुमारे ८१ लाख बॅरलची घट नोंदवण्यात आली आहे. या बातमीचे थेट परिणाम जागतिक तेल बाजारात उमटू शकतात. जर अमेरिका आणि इराणमध्ये यशस्वी करार झाला, तर पुरवठा सुरळीत होऊन किमतीत अधिक घट होईल. मात्र, पुन्हा तणाव वाढल्यास किमती पुन्हा भडकण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
भारतासाठी मोठा दिलासा
भारत आपल्या गरजेच्या जवळपास ८० टक्के कच्चे तेल आयात करतो. सध्या कच्चे तेल आयात करण्यासाठी भारताला जवळपास दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. परिणामी सरकारी तिजोरी वेगाने रिकामी होत आहे. अद्याप पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात सरकारला यश आलं असलं तरी ही स्थिती फारकाळ टीकाणारी नाही. अशा परिस्थितीत इंधन दरवाढीमुळे देशांतर्गत महागाईचा भडका उडू शकतो. दुसरीकडे एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाल्याने भारतीय उद्योगांना मोठा फटका बसला आहे. यामुळे आर्थिक विकासालाही खिळ बसण्याची भिती आहे. त्यामुळे ही बातमी भारतासाठी मोठा दिलासा देणारी आहे.
