Reddit Viral Post Interview Rejection: दिल्लीतील एका तरुणाने त्याचा नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीचा धक्कादायक अनुभव रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. रेडिटवर केलेल्या पोस्टमध्ये तरुणाने दावा केला आहे की, त्याची मुलाखत कथितरित्या अवघी १० मिनिटे चालली आणि त्याला तत्काळ नकार देण्यात आला. तरुणाने पोस्टमध्ये असेही सांगितले की या मुलाखतीसाठी हैदराबादला जाण्यासाठी त्याने विमान तिकिटांवर सुमारे १४,००० रुपये खर्च केले होते. तरुणाच्या या पोस्टमुळे नोकरभरतीच्या पद्धती, त्यासाठी लागणारा प्रवास खर्च आणि नोकरी मिळत नसल्याने उमेदवारांमध्ये वाढणारी निराशा यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
“मुलाखतीसाठी दिल्लीहून हैदराबादला गेलो, १४ हजार रुपये खर्च केले आणि अवघ्या १० मिनिटांतच नकार मिळाला”, या मथळ्याच्या पोस्टमध्ये, त्या युजरने म्हटले आहे की, या घटनेनंतर त्याला “फसवल्यासारखे आणि संतापल्यासारखे” वाटत आहे.
या युजरने सांगितले की, कंपनीने त्याचे प्रोफाइल तपासून पाहिल्यानंतर त्याचा निवड यादीत समावेश केला होता. त्यामुळे या पदासाठी आपला अनुभव पुरेसा आहे, असे त्याने गृहीत धरले होते. “मला वाटले की त्यांनी माझा अनुभव लक्षात घेतला आहे आणि तो त्यांना मला मुलाखतीसाठी बोलावण्याइतपत योग्य वाटला आहे. कारण माझे प्रोफाइल पाहिल्यानंतरच त्यांनी माझा निवड यादीत समावेश केला होता”, असे त्याने लिहिले.
त्याने सांगितले की, मुलाखतीसाठी त्याने रजा घेतली, अनेक दिवस तयारी केली आणि मुलाखतीसाठी दिल्लीहून हैदराबादचा प्रवास केला. यामध्ये केवळ विमान तिकिटांवरच त्याने “जवळपास १४,००० रुपये” खर्च केले.
मात्र, जेव्हा तो मुलाखतीसाठी पोहोचला, तेव्हा तिथली संपूर्ण प्रक्रिया सुरुवातीपासूनच काहीशी वेगळी वाटल्याचे त्याने सांगितले.
“ज्या क्षणी मी मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचलो, त्याच क्षणी मला काहीतरी खटकल्यासारखे वाटले”, असे त्याने नमूद केले. आपण तिथे पोहोचणाऱ्या पहिल्या काही उमेदवारांपैकी एक होतो आणि आपल्याला लवकर बोलावले जाईल अशी अपेक्षा होती, असे त्या उमेदवाराने सांगितले. मात्र, त्याऐवाजी तिथल्या ‘एचआर’ कर्मचाऱ्यांनी प्रामुख्याने तेलुगू भाषेत संवाद साधण्यास सुरुवात केली आणि तेलुगू भाषिक किंवा स्थानिक उमेदवारांना आपल्या आधी मुलाखतीसाठी बोलावले, असा आरोप त्याने केला.
“एकामागून एक, माझ्या आधी इतर उमेदवारांना मुलाखतीसाठी आत पाठवले गेले”, असे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच अनेक मुलाखती साधारणपणे २० ते ३० मिनिटे चालत असल्याचेही त्याने नमूद केले. अखेर जेव्हा त्याची पाळी आली, तेव्हा तो म्हणाला, “मुलाखत अवघी १० मिनिटे चालली.”
यावर प्रतिक्रिया देताना दुसऱ्या एका युजरने टिप्पणी केली की, कंपन्यांनी मुलाखतीसाठी प्रत्यक्ष बोलावताना, बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांच्या प्रवासाचा खर्च उचलला पाहिजे. इतरांनी असे मत मांडले की, जर एखादी कंपनी दुसऱ्या शहरात प्रत्यक्ष मुलाखत घेणे अनिवार्य करणार असेल, तर त्यांनी एकतर प्रवासाचा खर्च द्यावा किंवा किमान खर्चाच्या परताव्याबाबतची धोरणे आधीच स्पष्ट करावीत.
