Dia Mirza Mental Health Statement : एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीकडे किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्चपदस्थ व्यक्तीकडे पाहिल्यानंतर सामान्य माणसाच्या मनात पहिला विचार येतो की, ही व्यक्ती किती सुखी असेल! त्यांच्याकडे अफाट पैसा, नाव, प्रसिद्धी आणि हक्काचे घर सर्व काही असते. मात्र, बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिच्या एका खळबळजनक वक्तव्याने या समजाला मोठा तडा दिला आहे. “माझ्याकडे पैसा आहे, आर्थिक स्वातंत्र्य आहे, तरीही मी आनंदी नाही,” असे म्हणत तिने आजच्या पिढीच्या मानसिक आरोग्याचे आणि कॉर्पोरेट संस्कृतीचे विदारक वास्तव मांडले आहे.

अभिनेत्री दिया मिर्झा आनंदी नाही?

अभिनेत्री सोहा अली खानच्या ‘ऑल अबाउट हर’ या पॉडकास्टवरील एका मुलाखतीत दिया मिर्झाने सांगितले की, तिने पैसा कमावला, आवडत्या शहरात स्वतःचे घर घेतले आणि तिच्याकडे आर्थिक स्थैर्य आहे; कोणतेही बिल भरण्याची चिंता नाही. तरीही तिला हवा असलेला आनंद मिळत नाही. यानंतर सोशल मीडियावर मानसिक समाधान आणि कामाचा ताण यावर चर्चा सुरू झाली आहे.

यश आणि आर्थिक स्थैर्य असूनही माणसाला अपूर्ण का वाटते?

मानसशास्त्रज्ञ गुरलीन बरुआ यांच्या मते, जग झपाट्याने बदलत असून जीवनाचा अर्थ आणि महत्त्वाकांक्षा ही केवळ नोकरी किंवा उत्पन्नावरून ठरत नाही, याची जाणीव लोकांना होत आहे. कोरोना महामारीनंतर जगभरातील स्थिर नोकऱ्या अचानक गायब झाल्या, कंपन्यांनी एका रात्रीत कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. यामुळे आर्थिक सुरक्षिततेचा पाया ठिसूळ झाला आहे.

कॉर्पोरेट संस्कृतीत लोक बर्नआऊट होत आहेत

कॉर्पोरेट आणि हाय प्रोफाईल क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये आत्मपरीक्षण जास्त असते. विश्रांती न घेता सातत्याने काम करत राहिल्यामुळे शेवटी मानसिक थकवा आणि भावनिक अलिप्तता येते, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘बर्नआऊट’ म्हटले जाते. पूर्वीच्या काळी नोकरी हीच व्यक्तीची संपूर्ण ओळख मानली जायची. मात्र, आजच्या आधुनिक मानसशास्त्रानुसार, नोकरीला केवळ आर्थिक स्थैर्याचा एक भाग मानले जात असून, सर्जनशीलता आणि अभिव्यक्तीसाठी लोक आपले छंद, नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्याला अधिक प्राधान्य देत आहेत.

नवीन पिढी स्वाभिमान जपणारी

डॉ. रिम्पा सरकार यांच्या मते, आजची पिढी आपल्या पालकांना किंवा सहकाऱ्यांना कामाच्या दबावाखाली संपताना पाहत मोठी झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता आपल्या स्वाभिमानाची किंवा स्वतःच्या मूल्याची दोरी एखाद्या कंपनीच्या हातात न देण्याचा निर्णय घेतला आहे. लोक आता करिअरला ‘स्थैर्याच्या’ कप्प्यात ठेवून, त्यांची सर्जनशीलता, अभिव्यक्ती आणि स्वप्ने आयुष्याच्या इतर भागांमध्ये शोधत आहेत, जिथे त्यांचे स्वतःवर पूर्ण नियंत्रण असेल.

या मानसिक चिंतेवर उपाय काय?

  1. गुरलीन बरुआ यांच्या मते, आजच्या अनिश्चित काळात कामाबद्दल चिंता वाटणे सामान्य आहे, परंतु त्याचा अतिविचार केल्यास मानसिक आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
  2. जग अनिश्चित असून, आपण प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत नाही, या वास्तवाचा स्वीकार करणे.
  3. आपले काम प्रामाणिकपणे, पूर्ण लक्ष देऊन आणि योग्य तेवढेच प्रयत्न करून करणे.
  4. कामाच्या ठिकाणी सतत ‘परफेक्ट’ असण्याचा किंवा स्वतःला सिद्ध करण्याचा अट्टहास सोडून देणे.
  5. काम आणि आयुष्याचे योग्य संतुलन साधता येणे महत्त्वाचे आहे.

दिया मिर्झाच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, बँक बॅलन्स आणि भौतिक सुखसोयी तुम्हाला क्षणिक सुख देऊ शकतात, पण मनाचा खरा आनंद हा स्वतःची ओळख नोकरीपलीकडे शोधण्यात आणि जगण्याला एक वेगळा अर्थ देण्यातच दडलेला असतो.