Diesel Ethanol Blending Marathi : भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के इंधनाची आयात करतो. यासाठी देशाला प्रत्येक दिवशी अवाढव्य किंमत मोजावी लागते. जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी ही रक्कम दुप्पट होते. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार आता इथेनॉल मिश्रित इंधनाला प्राधान्य देत आहेत. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर, सरकारने आपला मोर्चा आता डिझेलकडे वळवला आहे. आता डिझेलमध्ये १५ टक्क्यांपर्यंत ‘आयसोब्युटेनॉल’ मिश्रित करण्याची योजना आखली जात आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

काय आहे आयसोब्युटेनॉल?

आयसोब्युटेनॉल हा इथेनॉलचाच एक घटक आहे. इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिश्रित करता येत नाही. त्यामुळेच इथेनॉलपासून ‘आयसोब्युटेनॉल’ तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले जात असून, ते डिझेलला एक सक्षम आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरेल, असं सरकारचं म्हणणं आहे. “इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिसळता येत नसल्याने आम्ही इथेनॉलपासून आयसोब्युटेनॉलची निर्मिती करत आहोत. डिझेलमध्ये १५% आयसोब्युटेनॉल मिश्रणाला मंजुरी देण्यासाठी सरकार वेगाने काम करत असून, देशाच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल,” असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

प्रायोगिक तत्त्वावरील चाचण्या यशस्वी

या नवीन प्रयोगाबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, की याचे प्रायोगिक परीक्षण यशस्वी राहिले आहे. “आम्ही दोन जनरेटर सेट १००% इथेनॉल आणि आयसोब्युटेनॉलवर यशस्वीरित्या चालवून दाखवले आहेत. यावरून हे सिद्ध होते की, या इंधनांवर चालणारी इंजिने भारतात सहज विकसित केली जाऊ शकतात,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोशल मीडियावरील अफवांना पेट्रोलियम मंत्रालयाचे चोख उत्तर

इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्यावरुन वाहनधारकांच्या मनात अजूनही गोंधळाचे वातावरण आहे. याविषयी अनेक अफवा सोशल मीडियामध्ये पसरत असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ‘ई-२०’ इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाबाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांचे खंडन केले होते.

मंत्रालयाने अधिकृत स्पष्टीकरण जारी करत सांगितले की, इथेनॉलच्या उत्पादनामुळे पाण्याच्या स्रोतांचा अतिवापर होतो, वाहनांचे इंजिन खराब होते किंवा विम्याचे दावे नाकारले जातात या सर्व अफवा पूर्णपणे खोट्या आणि निराधार आहेत. भारताचा हा संपूर्ण इंधन कार्यक्रम वैज्ञानिक अभ्यास, कडक नियामक सुरक्षा आणि जागतिक अनुभवांवर आधारित आहे.

‘ई-२०’ मुळे देशाचे १.९ लाख कोटी रुपये वाचले!

सरकारी आकडेवारीनुसार, भारताने डिसेंबर २०२५ मध्येच पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे ऐतिहासिक उद्दिष्ट वेळेपूर्वी साध्य केले आहे. या कार्यक्रमामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे फायदे झाले आहेत.

  • आतापर्यंत १.९ लाख कोटींपेक्षा जास्त परकीय चलन वाचले.
  • कच्च्या तेलाची आयात आणि त्यावरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी झाला.
  • इथेनॉल निर्मितीमुळे देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली.
  • कार्बन उत्सर्जनात घट झाल्याने प्रदूषण नियंत्रणात मदत मिळाली.
  • पेट्रोलियम क्षेत्रातील या यशानंतर आता डिझेलमध्ये १५% आयसोब्युटॅनॉल आणण्याच्या केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे भारताच्या ऑटोमोबाईल आणि कृषी क्षेत्राला आणखी मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.