Donald Trump Crypto Income updates from World Liberty Financial spark massive global interest: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कुटुंबाच्या ‘क्रिप्टो’ व्यवसायांमधून १.४ अब्ज डॉलर्सहून (सुमारे १२ हजार कोटी रुपये) अधिक उत्पन्न मिळाल्याची माहिती जाहीर केल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच आज सांगितले की, आपल्या वैयक्तिक आर्थिक व्यवहारांशी आपला काहीही संबंध नाही. अमेरिकेतील शेअर बाजार तेजीत असल्याने अनेक लोक नफा कमावत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
नॉर्थ डकोटाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी जॉइंट बेस अँड्र्यूज येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मी यात लक्ष घालत नाही. माझ्या पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी आमच्याकडे स्वतंत्र यंत्रणा (फंड्स) आहेत.”
यू.एस. ऑफिस ऑफ गव्हर्नमेंट एथिक्सकडे सादर केलेल्या २०२५ च्या वार्षिक आर्थिक विवरणपत्रातून असे दिसून आले की, ट्रम्प आणि त्यांच्या मुलांनी मिळून स्थापन केलेल्या वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल या क्रिप्टो उपक्रमाकडून त्यांच्या कंपन्यांना जवळपास ८०० दशलक्ष डॉलर्स नफा झाला आहे.
“तुम्हाला माहित आहे का मला नफा का होत आहे? कारण शेअर बाजार तेजीत आहे आणि यातून प्रत्येकजण नफा कमावत आहे”, असे ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रिप्टोमधून मिळवलेल्या या नफ्यातून हे अधोरेखित होते की, ‘क्रिप्टो’ने कशा प्रकारे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची आर्थिक स्थिती बदलली आहे. एका वर्षापूर्वी सादर केलेल्या माहितीमध्ये त्यांनी वर्ल्ड लिबर्टी मधील टोकन विक्रीतून ५७.३५ दशलक्ष डॉलर्सची कमाई केल्याचे सांगितले होते. तर, चालू वर्षी सादर केलेल्या अहवालात हा आकडा नऊ पटीने वाढला आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या अंदाजानुसार, २०२५ मध्ये ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्यापासून त्यांच्या कुटुंबाने क्रिप्टो-संबंधित प्रकल्पांतून किमान २.३ अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी अशा धोरणांची आणि उपक्रमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली जी या क्षेत्रासाठी फायदेशीर मानली जात आहे. स्टेबलकॉइन्ससाठी केंद्रीय नियम लागू करण्यापासून ते अमेरिकेचे न्याय विभाग आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन यांच्याकडून या क्षेत्रावर ठेवल्या जाणाऱ्या कठोर नियंत्रणात शिथिलता आणण्यापर्यंतच्या बाबींचा समावेश होता.
ट्रम्प यांनी अमेरिकेला जगाची ‘क्रिप्टो कॅपिटल’ बनवले
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या ॲना केली यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “राष्ट्राध्यक्ष किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी कधीही हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होईल असे कृत्य केलेले नाही आणि भविष्यातही ते तसे करणार नाहीत. कार्यकारी आदेशांच्या माध्यमातून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेला जगाची ‘क्रिप्टो कॅपिटल’ बनवले आहे, याचा त्यांना अभिमान आहे.”
केली पुढे म्हणाल्या, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाकडून घेण्यात आलेले सर्व निर्णय अमेरिकन जनतेच्या हितासाठीच असतात. जे तथाकथित ‘पत्रकार’ याच्या उलट दावे करत आहेत, ते केवळ जुना आणि खोटा प्रचार करत आहेत.”
