मुंबई : देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) भारतीय भांडवली बाजारावरील पकड अधिक घट्ट केली आहे. मार्च तिमाहीत आघाडीच्या ५०० कंपन्यांमधील त्यांची हिस्सेदारी अर्थात ‘निफ्टी ५००’ निर्देशांकात त्यांचा वाटा विक्रमी २०.९ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (एफआयआय) मालकी हिस्सा १७.१ टक्क्यांपर्यंत घसरला आहे, असे मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसेसने मंगळवारी प्रसिद्ध अहवालाने नमूद केले.

आर्थिक वर्ष २०२६ मध्ये भारतीय बाजार अस्थिर राहिला. जागतिक अनिश्चितता, विशेषतः इराण-इस्रायल/अमेरिका संघर्षामुळे निर्माण झालेला भू-राजकीय तणाव हे या अस्थिरतेचे मुख्य कारण होते. तरी, देशांतर्गत गुंतवणुकीच्या प्रवाहाने बाजाराला भक्कम आधार दिला. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी जानेवारी-मार्च २०२६ या कालावधीत २७.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली, ज्याला ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ म्हणजेच ‘एसआयपी’द्वारे होणाऱ्या स्थिर गुंतवणुकीचा भक्कम पाठिंबा लाभला. याउलट, परदेशी गुंतवणूकदरांकडून १,५८० कोटी डॉलर मूल्याच्या समभागांची निव्वळ विक्री झाली; यामध्ये मार्च महिन्यात भू-राजकीय तणाव वाढल्यामुळे झालेली १,४२० कोटी डॉलरच्या विक्रीच्या माऱ्याचा देखील समावेश आहे.

युद्धाचा तणाव निवळला आणि परिस्थिती पूर्ववत झाली, तर परकीयांकडून गुंतवणुकीचा प्रवाह सुधारण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना त्यांची विक्री जरी कमी झाली, तरी बाजाराकडून त्याचे स्वागत होईल. तसेच एफआयआयकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक गुंतवणुकीचा प्रवाह सुरू झाला, तर बाजारात मोठी तेजी दिसून येण्याची शक्यता आहे, असे अहवालाने म्हटले आहे.

मार्च २०२६ अखेर ‘निफ्टी ५००’मधील एफआयआय-डीआयआय मालकीचे गुणोत्तर आकुंचन पावून ०.८ पट इतके राहिले आहे, जे संस्थात्मक मालकीमध्ये झालेल्या एका संरचनात्मक बदलाचे निदर्शक आहे. अहवालाने पुढे असेही म्हटले आहे की, ‘फ्री फ्लोट’ निकषांनुसार एफआयआयची मालकी ३३.८ टक्क्यांवर घसरली, तर डीआयआयची मालकी वाढून ४१.२ टक्क्यांवर पोहोचली आहे. या काळात प्रवर्तकांची हिस्सेदारी बऱ्याच अंशी स्थिर राहून ४९.४ टक्के नोंदवली गेली, तर याच कालावधीत किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग किंचित वाढून १२.७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २४ पैकी २१ क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढवली; यामध्ये खासगी बँका, तंत्रज्ञान, दूरसंचार, स्थावर मालमत्ता, आरोग्यसेवा आणि बॅंकेतर वित्तसंस्था या क्षेत्रांतील गुंतवणुकीत सर्वाधिक वाढ दिसून आली. देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) या दोन्ही विभागांमधील गुंतवणूक वाढवून अनुक्रमे २१.५ टक्के आणि १७.५ टक्क्यांवर नेली आहे. अस्थिरता पचवून बाजाराला सावरण्यात देशी गुंतवणूकदारच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.