Donald Trump Crypto Earnings 2025 updates: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांनी २०२५ या आर्थिक वर्षात क्रिप्टोकरन्सीमधून मिळवलेल्या हजारो कोटी रुपयांच्या नफ्यामुळे चर्चेत आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या शपथविधीच्या काही दिवस आधीच $TRUMP हे ‘मीम-कॉइन’ सुरू केले होते. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे केवळ क्रिप्टो-धोरणांना अनुकूल अशा प्रशासनाचाच नव्हे, तर एका फायदेशीर कौटुंबिक व्यवसायालाही सुरुवात झाली होती. यातून ट्रम्प यांना गेल्या वर्षी कोट्यवधी डॉलर्सचा लाभ झाला. हा त्यांच्या एकूण क्रिप्टो-कमाईचा एक भाग होता. ज्याचे भारतीय रुपयांमध्ये सुमारे १२ हजार कोटी रुपये इतके मूल्य होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या $TRUMP ‘मीम-कॉइन’मधून हजारो कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली असली, तरी या कॉइनमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मात्र कमनशीबी ठरले आहेत. कारण, कॉइन मार्केट कॅपच्या आकडेवारीनुसार $TRUMP कॉइन सुरुवातीलाच प्रचंड यशस्वी ठरले आणि त्याचे बाजारमूल्य थेट १५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले होते. मात्र, आता त्याचे मूल्य केवळ ४०० दशलक्ष डॉलर्स इतके उरले आहे. याचाच अर्थ असा की, त्यात ९७ टक्क्यांची घसरण झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीमध्ये झालेल्या या प्रचंड वाढीमुळे यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, ट्रम्प यांनी २०२५ मधील आपल्या संपत्तीत झालेली ही प्रचंड वाढ शेअर बाजारामुळे झाल्याचे म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी जॉइंट बेस अँड्र्यूज येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मला नफा का होतोय हे तुम्हाला माहीत आहेच, कारण शेअर बाजार वर चालला आहे आणि प्रत्येकालाच याचा नफा होत आहे.”
“मी एक उत्तम व्यावसायिक आहे. मी प्रचंड पैसे कमावले आहेत, इतके पैसे की ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी ते पैसे गुंतवण्याची जबाबदारी इतरांवर सोपवली आहे. मी त्या लोकांशी बोलतही नाही, ते कोण आहेत हे मला माहीतही नाही, पण ते पैसे मोठ्या कंपन्यांकडे दिले जातात. माझा मुलगा एरिक ते सांभाळतो, पण मी त्याच्याशी अशा गोष्टींबद्दल चर्चा करत नाही,” असे ट्रम्प यांनी सीएनबीसीचे पत्रकार जो कर्नन यांना सांगितले.
अमेरिकन शेअर बाजारातील परिस्थिती
शेअर बाजारामुळे अमेरिकन नागरिकांच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचे मूल्य वाढत आहे, हे त्यांचे म्हणणे चुकीचे नाही. कारण, ज्यांनी २०२५ मध्ये ‘एस अँड पी ५००’ या निर्देशांकामध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर १७.९% इतका चांगला परतावा मिळाला आहे.
पण क्रिप्टो बाजारात मात्र वेगळीच परिस्थिती आहे. गेल्या वर्षी ट्रम्प यांच्या निव्वळ संपत्तीत झालेली मोठी वाढ ही शेअर्समुळे नाही, तर ‘क्रिप्टो’मुळे झाली आहे. त्यापैकी खूपच कमी हिस्सा हा क्रिप्टोकरन्सीमधील थेट गुंतवणुकीतून आला आहे. ट्रम्प यांना २०२५ मध्ये त्यांच्या क्रिप्टोमधील बहुतेक पैसा त्यांच्या कंपनीने विकलेल्या कॉइन्सवर मिळणारे व्यवहार शुल्क, परवाना शुल्क आणि इतर महसुलातून मिळाला आहे.
सीएनबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘क्रिप्टो’ गुंतवणुकीतून झालेल्या नफ्याचे समर्थन केले आहे. त्यांनी सांगितले की, पदावर असताना त्यांच्या वैयक्तिक आर्थिक व्यवहारांची जबाबदारी त्यांच्या मुलांवर होती. त्यामुळे यात कोणतेही बेकायदेशीर कृत्य झाले नाही.
